औरंगाबाद - उस्मानपुरा परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून प्रियकराने २२ लाख रुपये घेऊन धूम ठोकल्याची घटना उघडकीस आली. संपर्क करून, शोध घेऊनही प्रियकराचा थांगपत्ता लागत नसल्याने अखेर ३८ वर्षीय प्रेयसीने उस्मानपुरा पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून ज्ञानेश माणिकराव कांदे (३२, रा. परळी वैजनाथ, माधवबाग, जि. बीड) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रेयसी १३ वर्षांच्या मुलासोबत खाद्यपदार्थाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. पतीच्या निधनानंतर मुलासोबत स्वतंत्र राहून तिने खानावळ सुरू केली होती. त्या वेळी ज्ञानेशने तिच्याकडे मेस लावून राेज जेवायला जात होता. यादरम्यान, तिची परळी (जि.बीड) येथील ज्ञानेशसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाल्यानंतर दोघेही सोबत राहायला लागले. २०१४ मध्ये प्रेयसीने एक फ्लॅट विकत घेतला. यादरम्यान ज्ञानेश शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत होता. त्यामुळे त्याने प्रेयसीलादेखील मार्केटमधील नफ्याचे आमिष दाखवले. नवीन घेतलेला फ्लॅट विकून तो पैसे आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवून मोठा फ्लॅट विकत घेऊ, असे त्याने सांगितले. तिने विश्वास ठेवत १७ लाख ७५ हजारांत फ्लॅट विकला, एक एफडी मोडून त्याचे ४ लाख व इतर रक्कम असे एकूण २२ लाख रुपये दिले.
पहिले टाळाटाळ, नंतर पोबारा
ज्ञानेशने ती रक्कम शेअर मार्केटमध्ये गुतंवल्याचे सांगितले. प्रेयसीने काही दिवसांनंतर त्याला पैशांबाबत विचारणा केली असता, सध्या शेअर मार्केट चांगले सुरू आहे. थोडे दिवस थांब आपण एकत्र रक्कम काढून फ्लॅट घेऊ, असे सांगितले. मात्र, काही दिवसांत त्याने टाळाटाळ सुरू केली. त्यातून त्यांच्यात वाद झाला व त्यानंतर ज्ञानेश घरातून निघून गेला. तिने अनेक दिवस वाट पाहिली, मोबाइलवर संपर्क करून पैशाची मागणी केली. परंतु, पैसे देतो, असे म्हणून त्याने बाँडवर तिला लिहून दिले. त्यानंतर ११ लाखांचे दोन धनादेश दिले. पण, रक्कम परत केली नाही.