बीड-तब्ब्ल २३ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बीड बस स्थानकातून शनिवारी (दि.२७) प्रवाशांना घेऊन लालपरी धावली आहे.प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी बस स्थानकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून विभाग नियंत्रक अजय मोरे हे स्वतः या ठिकाणी उभा आहेत.
परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे इशारा दिल्यानंतर बीड आगारातील दीडशे पेक्षाअधिक कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रशासकीय विभागातील ११४,कार्यशाळातील २८,दोन चालक आणि १ वाहक सेवेत रुजू झाल्यानंतर आज सकाळी १०.३० च्या सुमारास बीड बसस्थानकातून गेवराईसाठी पहिली बस रवाना झाली आहे.दरम्यान अनेक चालक आणि वाहक संपावर ठाम असल्याचे चित्र आहे.
गेवराईसाठी केवळ ६ प्रवाशी
दरम्यान आज लालपरी धावणार हे जवळपास निश्चित होते.सकाळी १०.३० च्या सुमारास बीडवरून-गेवराईसाठी पहिली बस रवाना झाली यामध्ये केवळ सहा प्रवाशी बसमध्ये असल्याचे दिसून आले.
बीडवरून-केजसाठी बस सेवा सुरु
दरम्यान सकाळी बीड-गेवराई बस सुटल्यानंतर आज दुसरी बस बीड-मांजरसुंबा-नेकनूर-केज बस प्रवाशांसाठी धावली आहे.आज सकाळपासून प्रवाशांच्या सोईसाठी बस सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे विभाग नियंत्रक अजय मोरे यांनी म्हटले आहे.