Advertisement

महापुरुषांऐवजी लावला कार्यालयात स्वतःचाच फोटो

प्रजापत्र | Thursday, 25/11/2021
बातमी शेअर करा

आष्टी-शासकीय असो किंवा निमशासकीय प्रत्येक कार्यालय महापुरुषांचे फोटो लावणे बंधनकारक असते.मात्र आष्टी तालुक्यात एका तलाठ्याने आपल्या कार्यालयात महापुरुषांच्या ऐवजी चक्क स्वतःचा फोटो लावल्याने जिल्हाभर याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.आष्टी तालुक्यातील टाकळसिंग सज्जा येथे कार्यरत अरुण मोरे यांनी हा प्रताप केला आहे.

 

            आष्टी तालुक्यातील टाकळसिंग सज्जा ला नेमणूक असलेले तलाठी अरुण मोरे यांचे कार्यालय आष्टीत कृषी उत्पन्न बाजार समीती आवारात आहे. कार्यालयात महापुरुषांचे फोटो असणे लावण्याचा मोरे यांना विसर पडल्याचे दिसून आले. धक्कादायक म्हणजे, एकाही महापुरुषाचा फोटो न लावणाऱ्या तलाठी मोरे यांनी चक्क स्वतःचा फोटो कार्यालयात लावला आहे. आज सकाळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन पाहणी केली असता हे उघडकीस आले. हे निंदनीय असून तलाठी मोरे यांच्यावर वरिष्ठांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल साळवे, दिपक जाधव यांनी केली आहे. 

 

महापुरुषांची आणि माझी बरोबरी नाही... 

फोटो फ्रेम करून मी बॅगमध्ये ठेवला होता.हा फोटो मला गावाकडे घेऊन जायचा होता.मात्र, काही मुलांनी तो फोटो भिंतीवर लावला. महापुरुष आणि माझी बरोबरी होऊ शकत नाही. 

- अरुण मोरे, तलाठी, टाकळसिंग सज्जा

 

चौकशी करून कारवाई 

शासकीय नियमांनुसार कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत. पण तलाठ्याने स्वतःचाच फोटो लावणे हा धक्कादायक प्रकार आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. 

- विनोद गुंड्डमवार, तहसीलदार, आष्टी

Advertisement

Advertisement