मुंबई-मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील एसटी कामगारांचा संप आज संपणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, आंदोलनाचे नेतृत्व आपल्या हातात घेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी विलीनीकरण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा गुरुवारी दिला आहे. यानंतर आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी कठोर भूमिका घेतल्याचा पाहायला मिळत असून एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची डेडलाईन त्यांनी दिली आहे.
राज्य सरकारने बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ केली. पण, अॅड. सदावर्ते यांनी विलिनीकरण होईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा दिला आहे. यानंतर माध्यमांशी संवाद साधाना अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला आहे. 'आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये. एसटी कर्मचाऱ्यांची आम्ही उद्या सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर कठोर निर्णय घेऊ', असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी दिला.
...तर कठोर कारवाई केली जाणार
आंदोलनाबाबत बोलताना अनिल परब म्हणाले की, 'राज्य सरकारने आपली भूमिका कालच स्पष्ट केली आहे. आम्ही आमचा लेखाजोखा मांडला आहे. मागन्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते, पण काही कारणास्तव ते येत नाहीयेत. आम्ही आता उद्या सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर कठोर निर्णय घेऊ. जे कर्मचारी संपात राहतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल', असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.