नवी दिल्ली-काही लोकांना प्रँक करायला खूप आवडतं. लोकांची गंमत करुन त्यांची फजेती पाहण्यात त्यांना वेगळीच मजा जाणवते. हल्ली सोशल मीडियावर देखील असे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. मात्र काही वेळेस हे प्रँक अंगाशी देखील येऊ शकतात. असाच काहीसा प्रकार एका तरुणीसोबत घडला. लोकांची गंमत करण्याच्या नादात तिला आपला जीव गमवावा लागला. भूत बनून ती लोकांना घाबरवायला गेली मात्र घाबरलेल्या माणसानेच तिचा जीव घेतला.
एका वृत्तानुसार ही धक्कादायक घटना मेक्सिकोमधील नोकलपन डी जुआरेज येथे घडली. पोलिसांना एका तरुणीचं मृत शरीर सापडलं आहे. या तरुणीचं वय २० ते २५ वर्षांच्या आसपास आहे. गोळ्या घालून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी अद्याप या तरुणीची ओळख जाहिर केलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गोळ्या घालणारा आरोपी अद्याप फरार आहे.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ही तरुणी विविध प्रँक करुन लोकांना घाबरवायची. त्या दिवशी तिने चेटकिणीसारखा गेटअप परिधान केला होता. अचानक समोर येऊन येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना ती घाबरवत होती. याच दरम्यान तिला भूत समजून एका घाबरलेल्या व्यक्तीने तिच्यावर गोळ्या झाडल्या. अन् तो गाडीत बसून फरार झाला. सतत प्रँक करण्याच्या सवयीमुळेच तिचा जीव गेला. आसपासच्या लोकांना तिची ही सवय माहित होती त्यामुळे ते तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळे हा व्यक्ती शहराबाहेरचा असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
                                    
                                
                                
                              
