Advertisement

आडसकर – देशमुख समर्थकात राडा

प्रजापत्र | Thursday, 25/11/2021
बातमी शेअर करा

माजलगाव दि.25 नोव्हेंबर – माजलगाव विधानसभा मतदारसंघात भाजपा पक्षनेत्यातील गटबाजी मुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांना थेट धमकावण्याचा प्रकार बुधवारी समोर आला आहे. यामुळे काही काळ आडसकर व देशमुख गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सोशल मेडीयात एका वृत्तावर आलेल्या प्रतिक्रियानंतर सदरील प्रकार घडल्याची माहिती मिळाली.

 

 

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार भाजपाच्या वतीने नुकताच बुथप्रमुखांचा मेळावा बीड येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात माजी आमदार आर.टी. देशमुख यांना डावलल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. सोशल मेडीयात या वृत्ताला प्रतिक्रिया येत असतानाच एका कमेंटवरुन एका कार्यकर्त्यांस माजी आमदार आरटी. देशमुख यांच्या अंगरक्षकाने हात पाय तोडण्याची धमकी दिली. या संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.

 

 

याप्रकारामुळे माजलगाव व तेलगाव येथे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. माजलगाव मतदारसंघातील भाजपाचे नेते रमेश आडसकर औरंगाबादहून तात्काळ माजलगावात हजर झाले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. तेलगाव येथे काही काळ कार्यकर्त्यांत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचीही माहिती कळाली. एकंदरीत माजलगाव मतदारसंघात भाजपातील गटबाजी समोर आली असून यामुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे.

 

 

माजलगाव विधानसभा मतदारसंघ हा भाजपला अंतर्गत गटबाजीमुळे गमवावा लागलेला असताना या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या दोन वर्षांनंतरही नेत्यात असणाऱ्या गटबाजीमुळे व आमदारकीचे स्वप्न आता पासूनच पाहणाऱ्यांची संख्या तीन ते चार झाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र बेजारी होत आहे. भाजप कार्यकर्त्यांना नेमके कोणत्या नेत्याचे हात धरावेत हेही समजेनासे झाले आहे. भाजप निष्ठावंतांना शिव्यांची लाखोळी व हातपाय तोडण्या पर्यंतच्या धमक्या सहन करण्याची पाळी येत आहे. मग पक्षाचे काम कशाला करावे ? असाही प्रश्न या निष्ठावंताचा निर्माण होत आहे.

 

 

मात्र ही गटबाजी पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी थांबवायचे सोडून याला खत पाणी घालण्याचे काम एक प्रकारे करत असल्याचे या मतदारसंघात पक्षाच्या होणाऱ्या गटबाजीच्या कार्यक्रमा वरून दिसून येत आहे. त्यामुळे पक्ष निष्ठावंत पक्षापासून दुरावत आहेत. यामुळे ही गटबाजी थांबणार की विरोधकांना पुन्हा याचा फायदा होणार याची चर्चा मात्र जोरदारपणे सुरू आहे बुधवारी या मतदारसंघात सोशल मीडिया वरील पोस्टवरून झालेली घडामोड ही मात्र बीड जिल्ह्यात नव्हे तर राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

Advertisement

Advertisement