बीड : राज्यात सध्या नगरपालिकांसोबतच जिल्हापरिषद निवडणुकांचेही वेध लागलेले आहेत. जिल्हापरिषद गट आणि पंचायत समिती गणांची पुनर्रचना करण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाने दिले आहेत. त्यानूसार आता बीड जिल्हापरिषदेत यावर्षी आणखी एका गटाची भर पडणार असून केज तालुक्यात हा गट वाढणार आहे. यामुळे बीड जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 61 इतकी होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी गट, गण पनर्रचना करण्याचे आदेश चार दिवसांपूर्वी राज्य निवडणुक आयोगाने दिले होते. आता आयोगाने प्रत्येक जिल्हापरिषदेसाठीची सदस्य संख्या निश्चित केली आहे. त्यानूसार बीड जिल्हा परिषदेत 61 सदस्य राहणार आहेत.
यापूर्वी बीड जिल्हा परिषदेत साठ सदस्य होते. आता केज तालुक्यातील ग्रामीण लोकसंख्या 2 लाख 13 हजार 128 इतकी नोंदविण्यात आली आहे. यामुळे केज तालुक्यात 1 जिल्हापरिषद गट वाढणार असल्याचे निवडणुक आयोगाने कळविले आहे. पूर्वी केज तालुक्यात 6 जिल्हापरिषद गट होते आता पूनर्रचनेत जिल्हापरिषदेचे सहा गट आणि पंचायत समित्यांचे 14 गण तयार करावे लागणार आहेत. तर बीड जिल्ह्यातील पंचायात समिती सदस्यांची संख्या आता 122 होणार आहे.
केज तालुक्यात एक जिल्हापरिषद गट वाढत असल्याने आता सध्याच्या कोणत्या गटांमधून कोणती गावे बाहेर पडणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. हे करताना कोणाची राजकीय सोय होते आणि कोणाला गैरसोय होईल याकडेही सर्वांच्या नजरा असतील.
आयोग म्हणतो राजकीय दबाव नको, आ. सोळंकेंचे मात्र पत्र
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठीची गट, गण रचना करताना अधिकार्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये अशा स्पष्ट सूचना राज्य निवडणुक आयोगाने दिल्या आहेत. गट, गण पुनर्रचना निरपेक्ष पद्धतीने करावी असेही आयोगाने म्हटले आहे. त्याचवेळी धारुर तालुक्यातील तीन गटांमध्ये पुनर्रचना करण्यासाठी वेगवेगळ्या गावांचा कोठे समावेश करावा अशी शिफारस करणारे पत्र आ.प्रकाश सोळंके यांनी धारुरच्या तहसीलदारांना दिले आहे. यात तेलगाव गटात तीन, भोगलवाडी गटात सात तर आसरडोह गटात चार गावे समाविष्ट करण्यासाठी आ.सोळंकेंनी पत्र दिले आहे.