बीडः औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) सध्या बीड जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी करित आहेत. आज त्याचा समारोप होईल. मागच्या ५ दिवसात आयजिंनी अनेक गोष्टी पाहिल्या असतील पण ठाणेदारांच्या हद्दीत पंकज कुमावतांसारखे प्रोबेशनर अधिकारी किंवा विशेष पथक कारवाई करते, पण ठाणेदार गप्प असतात. जे प्रोबेशनर अधिकारी किंवा पथकाला दिसते ते ठाणेदारांना का दिसत नाही याचाही जाब आयजिंनी विचारावा असा सुर जनतेतला आहे.
बीड जिल्हयात सध्या अवैध धंद्यांनी धुमाकूळ घातला आहे. माफियागिरी देखील मोठया प्रमाणावर वाढली आहे. आणि या साऱ्या गोष्टींकडे स्थानिक ठाणेदारांची अर्थपूर्ण डोळेझाक असते. मागच्या काही दिवसात प्रोबेशनर सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी ज्या कारवाया केल्या त्यातून हे स्पष्ट झाले आहे. पंकज कुमावत असतिल किंवा विशेष पथक, यांनी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जाऊन गुटखा, वाळु, अवैध धंदे, बनावट दारु आदी प्रकारांवर कारवाया केल्या आहेत. ठाणेदारांच्या डोळयादेखत हे सारे धंदे ठिकठिकाणी सुरु होते. बाहेरुन आलेल्या अधिकाऱ्यांना हे धंदे दिसतात पण ठाणेदारांच्या डोळयांवर कशाची पट्टी असते एकदा याचिही तपासणी आयजिंनी करावी.
एनओसीचा बाजार
पोलीसांच्या जिल्हा विशेष शाखेमार्फत चारित्र्य पडताळणी आणि विविध नाहरकत प्रमाणपत्रे दिली जातात. मागच्या वर्षभरात या शाखेचे काम मोठयाप्रमाणावर सुस्तावले आहे. साध्या साध्या नाहरकत च्या संचिका सहा सहा महिने पडून असतात. चारित्र्य पडताळणीसाठी देखिल काहिशी अशीच परिस्थिती आहे. ही प्रमाणपत्रे येथून वेळेत न मिळण्यामागे अर्थपूर्ण अपेक्षा असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. बीड जिल्हयाच्या इतिहासात ज्या गोष्टींसाठी १५-२० दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी लागत नव्हता त्यासाठी आता ६-६ महिने लागत आहेत. या बाजाराची तपासणी सुध्दा आयजी करतिल का ?