बीड-मांजरसुंबा महसूल मंडळातील गावांना अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ द्यावे या मागणीसाठी सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सरपंच परिषदेच्या नेतृत्वाखाली मंझेरी फाटा येथे करण्यात आलेल्या रास्तारोको आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन प्रशासनास सादर केले.
खरिप हंगामातील पीक अतिवृष्टीने वाया गेले. जिल्हाभरात झालेल्या नुकसानीची दखल घेत शासनाने शेतकर्यांना मदत जाहीर केली. परंतु यातून मांजरसुंबा महसूल मंडळातील 22 ते 23 गावे वगळण्यात आली. या गावातील शेतकर्यांना अनुदान मिळावे या मागणीसाठी सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यानंतरही प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्याने सोमवारी मंझेरी फ ाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकर्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्ता अडवल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मंडळ अधिकारी साळुंंके यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह परिसरातील गावचे सरपंच व शेतकरी सहभागी होेते.
... तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
शेतकर्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी यासाठी उपोषण, रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या प्रश्नावर तातडीने पावले न उचलल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर सरपंच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्याचा इशारा सरपंच परिषदेचे जिल्हा समन्वयक अंबादास गुजर यांनी दिला आहे.