बीड दि.22 नोव्हेंबर – जिल्ह्यात आता कोरोना प्रतिबंधक लस घेतली तरच, दुकानदारांना आपली दुकाने उघडता येणार आहेत. तसेच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात लस बंधनकारक असणार आहे. “नो व्हॅक्सिन नो एंट्री” असा आदेश बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रात्री उशिरा काढले आहेत.
कोरोनाशी लढण्यासाठी कोरेाना प्रतिबंधक लस हे प्रभावी अस्त्र असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे प्रशासन लसीकरणासाठी विविध पर्याय वापरत आहे. शनिवारी माजलगाव शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकांची तपासणी करुन लस टोचून घेतलेली असेल तरच माजलगावात एंट्री अनथा माघारी अशी मोहिम जिल्हा आरोग्य प्रशासनाने राबविली होती. यापाठोपाठ आता जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री नवीन आदेश काढत सर्वच क्षेत्रात लस बंधनकारक केली आहे.
राज्याच्या तुलनेत बीड जिल्ह्याच्या लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. हे वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी, रात्री उशिरा जिल्ह्यात अनेक निर्बंध घातले आहेत. व्यवसायिकांबरोबरच शासकीय व निमशासकीय कर्मचार्यांना, लसीचा किमान एक डोस घेणे आवश्यक आहेत. लस घेतली नसल्यास व्यवसायिकाना दुकाने उघडता येणार नाहीत तर कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश करता येणार नाही.
शासकीय निमशासकीय कार्यालय, मंदिर यासह जवळपास सर्वच ठिकाणी, लस घेतली नसल्यास “नो व्हॕक्सिन नो इंट्री” असून प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, क्लासेससह इतर संस्थांमध्ये देखील लसीकरण केले नसल्यास प्रवेश नाकारला जाणार आहे. याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रात्री उशिरा काढले आहेत. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानंतर आता, बीड जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर लसीकरण बंधनकारक करण्यावर चर्चा झाली. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खुलासा करत अशा स्वरुपाचे बंधन टाकता येणार नाही असे जाहिर केले. मात्र यानंतर आकोला व रात्री बीड जिल्हाधिकाऱ्यांनी तोच कित्ता गिरवला यामुळे नागरीकांत संभ्रम निर्माण होत आहे. दरम्यान, लसीकरणाचा टक्का वाढत असल्याचे आरोग्य प्रशासनाकडून समोर येत आहे