Advertisement

नगरपालिका निवडणूक लांबणीवर!

प्रजापत्र | Wednesday, 17/11/2021
बातमी शेअर करा

बीड दि.16 (प्रतिनिधी) : नगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, मात्र अद्यापही त्याची अधिसूचनाच काढण्यात आलेली नाही, त्यातच सर्वच नगरपालिकांमधील सदस्यसंख्या वाढविण्याचा निर्णय देखील झालेला आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या नगरपालिकांमध्ये अद्याप प्रभाग रचनाच झालेली नाही. त्यामुळे या नगरपालिकांच्या निवडणूक लगेच घेणे शक्य होणार नसल्याचे चित्र आहे. नगरपालिकांच्या निवडणूक किमान 2-3 महिने लांबणीवर पडतील असे संकेत मिळत असून पुढील महिन्यात राज्यातील बहुतांश नागरपालिकांवर प्रशासक नेमला जाईल अशी माहिती आहे. बीड जिल्ह्यातील 6 नगरपालिकांची मुदत डिसेंबर महिन्यात संपत आहे. तर 5 नगरपंचायतींवर यापूर्वीच प्रशासक नेमण्यात आलेला आहे.

 

डिसेंबर महिन्यात राज्यातील बहुतांश नगरपालिकांची मुदत संपत आहे. त्यामुळे सर्वांनाच नगरपालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. 5 वर्षांपूर्वी आजच्या तारखेत नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम सुरु होता आणि चिन्ह वाटप देखील झाले होते. यावेळी मात्र निवडणुकांसाठी अजून पूर्वतयारी देखील झाली नसल्याचे चित्र आहे.

 

नगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग ठेवण्यावर सरकारचे एकमत झाले आहे. मात्र अद्याप त्यासाठीची अधिसूचना काढण्यात आलेली नाही. त्यातच नगरपालिकांमधील सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्री मंडळाने घेतला आहे. मात्र त्या संदर्भातील आदेश देखील अद्याप काढण्यात आलेले नाहीत. यामुळे प्रत्येक नगरपालिकेत नेमके किती सदस्य असतील हे निश्‍चित झाल्याशिवाय त्या पद्धतीने प्रभागरचना करता येणार नाही. प्रभागरचनाच नसल्यामुळे प्रभाग आरक्षण आणि इतर सर्वच गोष्टी रखडल्या आहेत.

 

या सर्व गोष्टी करायच्या झाल्यास त्याला किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यभरातील नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर जातील अशीच परिस्थिती सद्यातरी आहे.

 

त्यामुळे डिसेंबरमध्ये मुदत संपणार्‍या नगरपालिकांवर पुढच्या महिन्यात प्रशासक नेमला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी नगरपंचायतींची मुदत संपताच नगरपंचायतींवर उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांना प्रशासक नेमण्यात आले होते. तोच पॅटर्न नगरपालिकांच्या बाबतीत देखील राबविला जाईल असे संकेत आहेत. एकंदर नगरपालिका निवडणुकांसाठी फेब्रुवारी महिना उजाडेल अशी माहिती आहे.

Advertisement

Advertisement