Advertisement

कोरोनाचे ज्यादा बील उकळलेल्या दवाखान्यांवर कारवाई !

प्रजापत्र | Monday, 08/11/2021
बातमी शेअर करा

बीड दि.7 (प्रतिनिधी) : कोरोनामुळे एकल झालेल्या महिलांच्या तक्रारीनूसार आता कोरोना काळात ज्यादा बील उकळलेल्या दवाखान्यांची चौकशी सुरु झाली आहे. या दवाखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश जीवनदायी कार्यालयाकडून बीड जिल्ह्यातील प्रशासनाला दिले आहे. बीड जिल्हयातील तीन तक्रारी आरोग्य आणि सोसायटीचे डॉ.सुधाकर शिंदे यांनी बीडच्या जिल्हाप्रशासनाला पाठविले आहेत. ज्यादा बील उकळण्याच्या प्रत्येक प्रकरणात तातडीने कारवाई करा अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.

 

बीड जिल्ह्यात कोरोना काळात रुग्णालयांनी रुग्णांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याचे प्रकार समोर आले होते. राज्यभरात कोरोना काळातील बीले चर्चेचा विषय झाला होता. या पार्श्‍वभूमीवर अनेक संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारीही केल्या होत्या. राज्याच्या आरोग्य मंत्र्यांसोबतही संघटनांच्या बैठका झाल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर आता महात्मा फुले जीवनदायी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

ज्या ज्या रुग्णालयांनी असे बीले उकळले आहेत. त्यांच्याकडून अतिरीक्त रक्कम रुग्णाला परत करावी आणि अशा रुग्णालयांवर कारवाई देखील करावी असा निर्णय आरोग्य मंत्र्यांसोबतच्या बैठकीत झाला होता. त्यानूसार आता बीड जिल्ह्यातील तीन प्रकरणे पहिल्या टप्प्यात जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आली आहेत. यातील दोन प्रकरणे आष्टीच्या रुग्णालयातील आणि एक बीडच्या दवाखान्यातील आहे. या पूढेही जे कोणी रुग्ण अतिरीक्त बील उकळल्याची तक्रार करतील त्याची तातडीने दखल घेवून कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

 

कोरोना काळात उकळण्यात आलेल्या ज्यादा बीलाच्या संदर्भात आता मुंबईवरुनच चक्रे हलू लागल्याने डॉक्टरांमध्ये खळबळ माजली आहे. ज्या रुग्णांना रुग्णालयांनी जास्त बील आकारल्याचे वाटते त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे किंवा राज्य आरोग्य हमी सोसायटीकडे तक्रार केल्यास अशा प्रत्येक प्रकरणाची आता चौकशी होणार आहे. 
 

Advertisement

Advertisement