Advertisement

करोना: नवीन विषाणूमुळे मृतांची संख्या दुप्पटीने वाढण्याची भीती

प्रजापत्र | Saturday, 06/11/2021
बातमी शेअर करा

करोनासंदर्भातील एका संशोधनामध्ये दक्षिण आशियात राहणाऱ्या लोकांमध्ये अधिक घातक विषाणू आढळून आल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय. या विषाणूमुळे फुफ्फुसं निकामी होण्याची आणि करोनामुळे रुग्ण मरण पावण्याची शक्यता दुप्पटीने वाढण्याची शक्यता अधिक असल्याचं संशोधकांनी म्हटलंय. मंगळवारी गुरुवारी म्हणजेच ४ नोव्हेंबर रोजी हा अहवाल ऑक्सफर्ड विद्यापिठाच्या नेचर जेनेटिक्स या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलाय.

 

नवीन प्रकारच्या या जीनला म्हणजेच जनुकीय रचनेला एलझेडटीएफएल वन असं नाव देण्यात आलं आहे. या जीनमुळे फुफ्फुसांवर परिणाम होतो. आतापर्यंतच्या संशोधनांमध्ये आढळून आलेला हा सर्वात मोठा परिणाम करणारा जीन असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे दक्षिण आशियातील ६० टक्के लोकांमध्ये हा जनुकीय बदल आढळून येतो तर युरोपीयन देशांमधील केवळ १५ टक्के लोकांनामध्ये तो आढळतो असं संशोधक म्हणाले. भारतीय उपखंडामध्ये करोनाचा एवढा परिणाम का झाला यासंदर्भातील स्पष्टीकरण देणारं हे संशोधन असल्याचं सांगण्यात येत आहे.

संशोधनानुसार या नवीन जीनमुळे संसर्ग झाल्यानंतर फुफ्फुसांवर परिणाम होऊ न देणाऱ्या यंत्रणेला काम करण्यात अडथळा निर्माण होतो. जेव्हा हे जीन करोनाचा संसर्गासाठी जबाबदार असलेल्या सार्क कोव्ही टू या विषाणूसोबत एकत्र येतात तेव्हा ते अधिक घातक ठरतात आणि ते सहज एखाद्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारशक्तीवर मात करुन त्याला बाधित करु शकतात असं संशोधक म्हणतात. तसेच एलझेडटीएफ वनचा अंश असणाऱ्या लोकांना लसीकरणाचा फार फायदा होतो असा दावाही संशोधनात करण्यात आलाय.

 

 

यापूर्वी सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे वेगवेगळ्या वंशाच्या लोकांवर करोनाचा वेगवेगळा परिणाम झाल्याचं म्हटलं जात होतं, असं मत फ्रॅन्सीस फ्लिंटर यांनी व्यक्त केलं आहे. फ्लिंटर हे गाइज् अॅण्ड सेंट थॉमस एनएचएश फाऊण्डेशन ट्रस्ट युकेमध्ये या विषयावर संशोधन करणारे प्राध्यापक आहेत. करोनाचा परिणाम हा केवळ सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर अवलंबून नसून इतर गोष्टीही कारणीभूत असल्याचं आता स्पष्ट झालं असून अजून संशोधन करणं गरजेचं आहे. करोनाचा संसर्ग होऊन त्याचा श्वसन संस्थेवर परिणाम करण्यासाठी एलझेडटीएफएल वन जीन कारणीभूत ठरतो.
 

Advertisement

Advertisement