लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने राज्यात दिग्गज नेत्यांच्या सभांचा धुरळा पाहायला मिळत आहे. शिरुर लोकसभेचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची हडपसर येथे जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले शरद पवार?
"या देशात अनेक निवडणुका झाल्या. पण यावेळी पहिल्यांदाच सात टप्प्यात निवडणुका होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भुमिकेवर संशय निर्माण होतोय. बारामती लोकसभा निवडणुकीत वेल्हे मध्ये जिल्हा बँकेची शाखा दोन वाजता सुरु होती. मतदानाच्या दिवशी रात्री दोन वाजता ही शाखा सुरु होती. महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं. ही गोष्ट निवडणूक आयोगावर संशय निर्माण करणारी आहे," असे शरद पवार म्हणाले.
"निवडणुकीत एखादे प्रधानमंत्री कोणत्याही राज्यात एवढ्या वेळा सभा घेण्यासाठी आले नव्हते. आजपर्यंत हे कधी घडलं नाही. आज का घडतंय? यामागे दोन कारणं असू शकतात, त्यांना शंका असावी निकाल आपल्या बाजुने लागत नाही. म्हणून सभा घेत असावेत. किंवा सभा घेऊन यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असावेत," असा संशय शरद पवार यांनी व्यक्त केला.
"नेहरु गांधींचा विचार मजबुत केला पाहिजे असे मी म्हटले. तर मोदी म्हणतात आमच्या पक्षात या. तुमचा पक्ष तुम्हाला लखलाभ. त्यांच्या पक्षात कोण जाणार? त्यांच्या पक्षात व्यक्ती स्वातंत्र्य नाही. मी आणि उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षात जाणार नाही. मोदिंना टीका सहन होत नाही. टीका केली की खोटे गुन्हे दाखल करतात, तुरुंगात टाकतात, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.