Advertisement

एसटीची चाकं पुन्हा थांबली! कर्मचाऱ्यांनी पुकारला स्वयंघोषित बेमुदत संप

प्रजापत्र | Thursday, 04/11/2021
बातमी शेअर करा

बीड जिल्ह्यात एसटीचं चाक पुन्हा एकदा थांबलं असून एसटी कर्मचाऱ्यांनी संघटना विरहित स्वयंघोषित बेमुदत संप पुकारलेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं तात्काळ शासनात विलीनीकरण करा. ही प्रमुख मागणी घेऊन हा बेमुदत संप कर्मचाऱ्यांनी पुकारला आहे. आज सकाळ पासून या संपाला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील बीड, गेवराई तालुक्यातील डेपो मधून एकही बस बाहेर गेली नाही. यामुळे ऐन दिवाळीच्या सणामध्ये आता, संप पुकारल्याने प्रवाशांचे बेहाल होत आहेत.

 

तर हा संप हाणून पाडण्यासाठी, दडपण्यासाठी, बीड आगारातील नियंत्रकासह पोलीस प्रशासनाकडून दबाव येत आहे. बसस्थानकाच्या आवारात असणारा पेंडॉल बाहेर काढा, यासाठी पोलीस दबाव आणत आहेत. नियंत्रकांनी झाडाखाली बसलेल्या महिला कर्मचाऱ्यांना देखील, त्या ठिकाणाहून हाकलून दिलंय. पोलीस देखील दबाव टाकत आहेत. याअगोदर संघटनेने पुकारलेल्या उपोषणाचा पेंडॉल याचं ठिकाणी होता. त्यावेळी कोणीच बाहेर काढलं नाही, मात्र आता कर्मचाऱ्यांनी स्वयंघोषित संप पुकारल्याने कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जातोय. असा आरोप करत कर्मचाऱ्यांचा अंत प्रशासनाने पाहू नये.

 

आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये. आतापर्यंत 33 जणांनी आपला जीव दिला आहे. यामध्ये 34 ची भर घालण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये. आमच्या मागण्या आम्ही लोकशाही पद्धतीने मागत आहोत, मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नाही, तर हा संप असाच बेमुदत स्वरूपात चालू राहील. आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची असेल. असा इशारा देखील आंदोलनकर्त्या महिला कर्मचाऱ्यांसह इतरांनी दिलाय. तर यावेळी आपली व्यथा मांडताना, कर्मचाऱ्याला अश्रू अनावर देखील झाल्याचं पाहायला मिळालं.

Advertisement

Advertisement