खाजगी कंपनीच्या स्वयंचलित हवामान केंद्राची चलती
बीड दि.21 (प्रतिनिधी) : पावसाची नोंद घेण्यासाठी महसूल विभागाकडून मंडळ स्तरावर बसविण्यात आलेले पर्जन्यमापक आता कालबाह्य झाले असून पर्जन्य मापकाद्वारे पावसाची नोंद घेणे बंद करण्यात आले आहे. त्या ऐवजी आता ‘महावेध’ या खाजगी कंपनीच्या स्वयंचलित हवामान केंद्रा आधारे दिली जाणारी माहिती राज्य सरकार अधिकृत मानत आहे.
राज्यात पावसाची नोंद घेण्यासाठी महसुल विभागाने मंडळ स्तरावर पर्जन्यमापक बसविले होते. पावसाळ्यात या पर्जन्यमापकाच्या माध्यमातून रोज पावसाची नोंद घेतली जायची आणि ही आकडेवारी जिल्हास्तरावर नियमित संकलित केली जायची. दुष्काळ, अतिवृष्टी आदीसाठी मदत जाहीर करताना किंवा कोणतेही निर्णय घेताना ही आकडेवारी महत्वाची ठरायची आता मात्र महसुलचे पर्जन्यमापक मोडीत काढण्यात आले आहेत. राज्यशासनाने महावेध या खाजगी कंपनीसोबत करार केला असून स्कायमेटच्या माध्यमातून महावेधने मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उघडले आहेत. या माध्यमातूनच आता रोजच्या पावसाची नोंद घेतली जात आहे. विशेष म्हणजे महावेधच्या माध्यमातून घेतली जाणारी नोंदच दुष्काळ, अतिवृष्टी, पिकविमा या सर्व बाबींसाठी अधिकृत मानली जाणार असल्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे.