बीड-एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने २७ ऑक्टोबरपासून राज्यस्तरीय बेमुदत उपोषण सुरू करण्यात येत आहे. या उपोषणास बीड जिल्ह्यातून मोठा पाठिंबा मिळत असून जिल्ह्यातील एकही आगारातून बस सुटली नसल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.हा संप लवकर न मिटल्यास राज्य परिवहन मंडळाला मोठा फाटक बसणार असून प्रवाशांचे ही मोठे हाल होणार आहेत.
वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के करावा, राज्य सरकार प्रमाणे देय महागाई भत्ता अदा करावा, राज्य सरकारप्रमाणे देय घर भाडे अदा करावे, सण उचल म्हणून बारा हजार पाचशे रुपये दिवाळीपूर्वी अदा करावी, दिवाळीपूर्वी पंधरा हजार रुपये बोनस मिळावा या मागणीसाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून राज्यभर या संपामुळे लालपरीचे चाके थांबली आहे. राज्य सरकारकडून दोन दिवसापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना २ हजार ५०० तर अधिकाऱ्यांना ५ हजार बोनस जाहीर केला होता.मात्र एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने राज्यभर एसटी बस ऐन दिवाळीच्या तोंडावर बंद आहेत.आता संपावर लवकरच तोडगा न निघाल्यास प्रवाशांचे मोठे हाल होणार असून खाजगी वाहतूक दारांकडून आर्थिक लूट ही होत असल्याचे चित्र आहे.