बीड : राज्यात विशेषतः मराठवाड्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान अखेर आले आहे. मात्र दिवाळी गोड करण्याचा शब्द दिलेल्या सरकारने केवळ ७५ % च अनुदान दिले आहे. त्यामुळे हेक्टरी १० हजाराची स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात सध्या तरी केवळ हेक्टरी ७५०० रुपयेच पडणार आहेत.
राज्यात , त्यातही मराठवाड्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. त्या नुकसानीपोटी हेक्टरी १० हजाराच्या मदतीची घोषणा शासनाने केली होती. मात्र त्याचा जीआर काढायला शासनाला घोषणेनंतर ८ दिवस लागले. त्यातही शासनाने पंचनाम्याची खुट्टी मारली होती. हे कमी की काय म्हणून आता शासन नुकसानीचे सारे अनुदान देखील एकाच टप्प्यात देणार नाही. पहिल्या टप्प्यात ७५ % इतकेच अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठीचा राज्यासाठी २ हजार ८६० कोटींचा निधी शासनाने दिला असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर सदर निधी वर्ग करण्यात आला आहे.
मराठवाड्यासाठी यातील २ हजार ८२१ कोटी रुपये मंजूर झाले असून बीड ५०५ कोटी, लातूर ३३६ कोटी, तर उस्मानाबाद २८१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मात्र हे अनुदान मंजूर झाले असले तरी पंचनामे करून लाभार्थी निश्चित करूनच अनुदान वाटप करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
बातमी शेअर करा