Advertisement

केंद्रातले भाजप सरकार सर्वसामान्यांचे खिसे कापत आहे - नाना पटोले

प्रजापत्र | Sunday, 24/10/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.२४ - दिवसा ढवळ्या केंद्रातले भाजप सरकार सर्वसामान्य माणसांचे खिसे कापत आहे. तुमचा पैसा मोठ्यांकडे वळवण्याचे पाप यांनी केले असून अंबानी अदानींची संपत्ती चौपट केली. केंद्रातले सरकार शेतकरी विरोधी आहे. असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारवर केला. ते अंबाजोगाई येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
              

        महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच राज्यसभा सदस्य खा.रजनीताई पाटील यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अंबाजोगाई येथे संपन्न झालेला काँग्रेस कार्यकर्ता मेळावा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे अभूतपूर्व झाला. व्यासपीठावर माजी मंत्री अशोकराव पाटील, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आदित्य पाटील, सिराज देशमुख, बाबुराव मुंडे, हनुमंत मोरे, किरण पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व जेष्ठ व तरुण पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खा.रजनीताई पाटील ह्या खासदार झाल्यामुळे भव्य सत्कारही करण्यात आला.
           पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, जिल्ह्यातील काँग्रेस संपली अशी अफवा ज्यांनी पसरवली होती त्यांच्या कानाखाली चपराक म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. जिल्ह्यात ओबीसींचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दिल्लीत विचारधारा नसलेले सरकार बसलेले आहे. कांही लोकांनी मी पुन्हा येईन असं म्हणत स्वप्न दाखवलं असा चिमटा फडणवीसांना काढला. केंद्राने इंपेरिकल डाटा न दिल्याने ओबीसींचे नुकसान झाले आहे. सर्वात अगोदर ओबीसींसाठी आम्ही विधानसभेत ठराव आणला. खुर्चीवर बसले की समाजाला विसरतात परंतु आम्ही तसे केले नाही. मागच्या काळात जे झाले ते विसरून जा, जी ताकत हवी असेल ती देऊ. मात्र अडजेस्टमेंट करणाऱ्याची कुठल्याच कार्यकर्त्यांची खैर नसल्याचेही त्यांनी सांगितले. ही देश वाचवण्याची वेळ आहे. काँग्रेस हा देशाचा पक्ष आहे आणि हाच पक्ष न्याय देऊ शकतो. तिकीट मागण्यासाठी लोक तुमच्या दारात येतील असेही नाना पटोले अशोकराव पाटील यांना उद्देशून म्हणाले.
            तर खासदार रजनीताई पाटील यांनी भव्य सत्कार केल्याबद्दल सर्वप्रथम आभार व्यक्त केले. तसेच अंबाजोगाईला ऐतिहासिक वारसा असल्याने हा मेळावा अंबाजोगाईत घेतला असल्याचे म्हटले.वैचारिक परंपरा आहे. त्यामुळे नानाभाऊ आपला विचार संपूर्ण मराठवाड्यात रुजनार आहे. या जिल्ह्याला मोठं मोठे खासदार काँग्रेस ने दिले.नानभाऊंनी दिलेली  स्वबळाची हाक ही संकुचित विचाराने घेऊ नका त्याचा स्वतःची ताकत ओळखा असा अर्थ आहे. राहुल गांधींना पंतप्रधान घेण्यासाठी कामाला लागा.शपथ घेण्याअगोदर मी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. बीड हा माझा जिल्हा असून माझे लक्ष कायम जिल्ह्यावर राहणार असल्याचा विश्वास दाखवला. जिल्हा एक नंबरवर आणण्याचा शब्दही रजनीताई पाटील यांनी नाना पटोले यांना दिला.
         तसेच यावेळी अशोकराव पाटील यांनी बोलताना, सात वर्षाच्या खंडानंतर बीड जिल्ह्यात प्रचंड मोठा मेळावा होतोय. खमक्या राजेसाहेब देशमुख यांनी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ज्यांनी आज काँग्रेस मध्ये प्रवेश केला ते मधल्या काळात थोडेसे बाजूला झाले होते. पुन्हा बीड जिल्हा काँग्रेसमय करायचा आहे. काँग्रेस ने सर्वसामान्य लोकांना ओळख दिली असे मनोगत व्यक्त केले.
                  यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे व बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी यांनी प्रास्ताविक करताना, नानाभाऊ आपल्याला महाराष्ट्र मुख्यमंत्री झालेले पाहू इच्छितो, त्यासाठी आम्ही तुम्हाला शब्द देतो. आम्ही जास्तीतजास्त ताकत लावण्याचा प्रयत्न करू.ये तो सिर्फ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है कारण आज झालेली गर्दी ही जिल्ह्यात काँग्रेस मध्ये असलेले चैतन्य दाखवते असेही राहुल सोनवणे यांनी सांगितले. तर राजेसाहेब यांनी, नानाभाऊ मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत. स्वाभिमानी नाना भाऊंनी भाजपचा राजीनामा देऊन विचारधारेच्या पक्षात प्रवेश केला. जिल्ह्यात हाडामासाची काँग्रेस आहे. पहिल्या सर्व कामिट्या बरखास्त करून तरुणांना संधी दिली जाणार. 1980 ची लाट नाना भाऊंच्या नेतृत्वाखाली येणार. 25 हजार लोकांच्या उपस्थितीत लवकरच नाना भाऊंच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात येणार असल्याचेही राजेसाहेब देशमुख यांनी यावेळी सांगितले.
                जिल्ह्यातील सर्वच भागातून मोठ्या प्रमाणावर काँग्रेस कार्यकर्ते अंबाजोगाईत दाखल झाले होते. यशवंतराव चव्हाण चौकातून यावेळी हजारो मोटारसायकल ची रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग सभागृहा समोर रॅली चे विसर्जन करण्यात आले. यावेळी चौकाचौकात जेसीबी च्या साहाय्याने मोठमोठे पुष्पगुच्छ घालून नाना पटोले आणि खा.रजनीताई पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.तर स्वागत समारंभानंतर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Advertisement

Advertisement