Advertisement

रोहित्र दुरूस्ती केंद्रास भीषण आग

प्रजापत्र | Thursday, 21/10/2021
बातमी शेअर करा

कडा-सांगळे गोठा येथील एका रोहित्र दुरुस्ती केंद्रात गुरुवारी (दि.२१) पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. दैवबलवत्तर म्हणून आगीत केंद्रात असणारे चार कामगार बचावले आहेत. दरम्यान, आगीत जवळपास ३० लाख रूपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. 

             आष्टी तालुक्यातील कडा येथील हरिश्चंद्र सांगळे यांनी दोन महिन्यांपूर्वी कष्टातून नगर बीड राष्ट्रीय महामार्गावरील सांगळे गोठा येथे ट्रान्सफॉर्मर दुरूस्ती केंद्र सुरु केले आहे. बुधवारी रात्री केंद्रात ४ कामगार काम पूर्ण करून आतमध्ये झोपी गेले होते. अचानक गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास केंद्रात शाॅटसर्किट झाला आणि भीषण आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. माहिती मिळतच ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने अग्निशमन दल दाखल झाले. त्यांनी मोठे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. दरम्यान, प्रसंगावधान राखून चारही कामगार केंद्रातून वेळीच बाहेर पडले. यामुळे मोठा अनर्थ टळला. या भीषण आगीत इलेक्ट्रिकल, ट्रान्सफॉर्मरचे अंदाजे ३० लाखाचे सर्व साहित्य जळून खाक झाले. रघुनाथ कर्डिले, दादा थोरवे, बाळासाहेब कर्डिले, बाळासाहेब थोरवे, नानाभाऊ वाडेकर, हरिचंद्र सांगळे आदी ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच पोलिस शिपाई मंगेश मिसाळ, बंडु दुधाळ यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य केले.

Advertisement

Advertisement