Advertisement

अखेर राजकिशोर मोदी राष्ट्रवादीत

प्रजापत्र | Thursday, 21/10/2021
बातमी शेअर करा

मुंबई : अंबाजोगाई नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजकिशोर मोदी राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये होते. ते यापूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देखील होते. मात्र मागच्या काही काळात काँग्रेस पक्षात सामान्य कार्यकर्त्याला डावलले जात असल्याने ते अस्वस्थ होते. त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला.यावेळी अजित पवार यांनी या प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकत जिल्ह्यात वाढली आहे. याचा फायदा केज विधानसभा मतदारसंघात होईल असे सांगितले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे,राज्य मंत्री संजय बनसोडे , आ. संदीप क्षीरसागर , आ. बाळासाहेब आजबे ,आ. सतीश चव्हाण, आ. संजय दौंड ,शेख मेहबूब , राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला .

बीड जिल्ह्यात काँग्रेस रविण्यात स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व टिकविण्यात राजकिशोर मोदी यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. अंबाजोगाई स्थरावर राजकिशोर मोदी यांचा पगडा असून त्यांच्यामुळेच अंबाजोगाई नगर परिषद काँग्रेसकडे राहत आलेली आहे. विलासराव देशमुख यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या मोदींना मागच्या काही काळात काँग्रेसमध्ये डावलले जात होते. म्हणून त्यांनी अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

यावेळी अजित पवार यांनी मोदी हे काँग्रेसमधील एक भारदस्त व्यक्तिमत्व राहिले आहेत. विकासासाठी पाठपुरावा करणारा कार्यकर्ता म्हणून मोदींना मी पाहत आलो आहे. आपली विचारधारा एक आहे. आम्ही विकासासाठीच काम करीत आहोत. आपल्याला विकासकामासाठी कायम सहकार्य करू . आता राष्ट्रवादीची ताकत जिल्ह्यात वाढली आहे. याचा फायदा केज विधानसभा मतदारसंघात होईल असे पवार म्हणाले. आपल्याला बेरजेचे राजकारण करायचे आहे. पक्षात प्रत्येकाने ज्याला त्याला आपला मानसन्मान द्यावा , पक्षात वाद होणार नाहीत असेही पवार म्हणाले. मोदींचे संबंध केवळ बीड जिल्ह्यात नाही तर लातूर, गंगाखेड, उस्मानाबाद आदी ठिकाणी आहेत. त्याचाही पक्षाला फायदा होईल असेही पवार म्हणाले.

यावेळी मोदी काँग्रेस सोडणार दिवसांपूर्वीच अंदाज आला होता असे धनंजय मुंडे म्हणाले. अंबाजोगाई हलली की जिल्ह्याचे राजकारण हलते. आता मोदींच्या राष्ट्रवादी प्रवेशाने अंबाजोगाई परिसरात राष्ट्रवादी आणखी बळकटी येणार आहे असे ते म्हणाले. अंबाजोगाईतून आता भाजप हद्दपार झाला पाहिजे असेही मुंडे म्हणाले. केज विधासभा मतदारसंघावर सुद्धा आता राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असेही मुंडे म्हणाले. तसेच आजच्या प्रवेशाने जुन्या कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही, सर्वांना न्याय मिळेल. नवे जुने काही नाही, आपण सारे राष्ट्रवादी आहोत असे मुंडे म्हणाले.

राजकिशोर मोदी यांनी यावेळी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे , राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी आम्हाला सातत्याने विकासकामात मदत केली, त्यावेळी पक्ष पहिला नाही . त्यामुळेच विकासासाठी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करीत आहोत. काँग्रेस सोडताना वेदना होतात पण समविचारी पक्षातच प्रवेश करीत आहोत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात चांगले काम करून दाखवू असे मोदी म्हणाले. यावेळी माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. राजेंद्र जगताप, डॉ. नरेंद्र काळे यांचीही उपस्थिती होती.

यावेळी विष्णुपंत सोळंके , प्रकाश सोळंकी , राजेश इंगोले , महादेव धांडे यांच्यासह अनेकांनी मोदी यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Advertisement

Advertisement