Advertisement

कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून दोन शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Thursday, 21/10/2021
बातमी शेअर करा

बीड : मराठवाड्यात अतिवृष्टीने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून बीड जिल्ह्यात दोन तरुण शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.

 

अतिवृष्टी होऊन दीड महिना उलटून गेला मात्र अद्याप मदत मिळाली नाही. यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. केज तालुक्यातील साळेगाव येथील बाळासाहेब रामलिंग गीते आणि खळवट लिंबगावमध्ये 34 वर्षीय सिद्धेश्वर धर्मराज फरताडे या तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोन घटनेने बीड जिल्हा हादरून गेला आहे.

 

केज तालुक्यात साळेगाव येथील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने पिके माती सह वाहून गेल्याने शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतात केलेला खर्च देखील निघत नाही. त्यामुळेआर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. तालुक्यातील साळेगाव येथील बालासाहेब रामलिंग गीते हा तरुण शेतकरी या नुकसानीमुळे नैराश्यात होता. यातूनच आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास लवण शिवारातील लिंबाच्या झाडाला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

 

 

माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पोलिस नाईक अशोक गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्याच्या पश्चात पत्नी कोमल (24) व आदित्य (6) व मुलगी अंजली ( ४) असा परिवार आहे. विचित्र!  तर दुसरीकडे वडवणी तालुक्यातील खळवट लिंबगावमध्ये 34 वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

 

ही घटना मध्यरात्री 2 च्या दरम्यान घडली आहे. सिद्धेश्वर धर्मराज फरताडे (वय 34 वर्ष )असं आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्याच नाव आहे. सिद्धेश्वर फरताडे हे अल्पभूधारक शेतकरी तथा ऊसतोड कामगार होते. दरवर्षी ते शेती व ऊसतोडी करत आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित होते.

 

यंदा शेतात सोयाबीन अन् पपईचं पिक घेतलं. यातील सोयाबीन अतिवृष्टीने गेली तर पपईवर कीड आल्याने ते देखील गेलं. त्यामुळे अतिवृष्टीने झालेलं नुकसान अन् त्यात कर्जबाजारीपणा याच परिस्थितीच्या समोर हार मानली आणि राहत्या घरी गळफास घेऊन स्वतः चे जीवन संपविले. अशी माहिती नातेवाईकांनी दिली. मयत सिद्धेश्वर फरताडे यांच्या पश्चात पत्नी व २ मुले असा परिवार आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढत असल्याने, प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचं झालं आहे.

Advertisement

Advertisement