नालंदा-बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाता करत असले तरी त्यांच्याच गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नालंदा जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचं अपहरण करण्यात आलं होतं आणि ५० लाखांची खंडणी न दिल्यानं अपहरणकर्त्यांनी विद्यार्थ्याला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. १६ ऑक्टोबर रोजी बिहार ठाणे हद्दीतून विद्युत विभागात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं.
मुसादपूर येथील रहिवासी कर्मी उर्मिला देवी यांनी त्यांचा २० वर्षीय मुलगा नितीश याचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. चौकशी दरम्यान, पोलिसांनी शाळेच्या संचालकांसह दोन संशयितांना ताब्यात घेतलं होतं. अपहरणकर्त्यांनी मंगळवारी सोहसरायच्या आशानगर येथील मदर तेरेसा शाळेच्या परिसरातून पोलिसांना हत्या प्रकरणाचे पुरावे हाती लागले. अपहरणकर्त्यांनी नितीश याला चक्क जीवंत जाळलं आणि त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करुन नदीत टाकून दिले. अटकेत असलेला शाळेचा संचालक दीपक कुमार उर्मिला देवी यांचाच कुटुंबिय असल्याचीही माहिती समोर आली आहे.
इतर आरोपींचा शोध सुरू
डीसीपी शिब्ली नोमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेच्या परिसरात हत्येसंदर्भात पुरावे हाती लागले. त्यानंतर श्वानपथकाला पाचारण करण्यात आलं व संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. आरोपींनी तरुणाला जीवंत जाळलं आणि त्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करुन नदीत टाकले. या घटनेशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेण्यासंदर्भात छापेमारी सुरू आहे.
१६ ऑक्टोबरपर्यंत ५० लाखांच्या खंडणीची केली होती मागणी
उर्मिला देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी नितीशनं त्याला ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरुन एक टेबल मागवायचा होता म्हणून १५० रुपये देऊन मी कामावर निघाले. संध्याकाळी घरी पोहोचले तेव्हा नितीश घरी नव्हता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्यानं त्याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तर मोबाइलही स्विच ऑफ येऊ लागला. मध्यरात्री नितीशच्या मोबाइलवर एक फोन कॉल आला आणि खंडणीची मागणी केली गेली. नितीशचं अपहरण करण्यात आलं असून ५० लाख दिले नाहीत तर त्याला ठार करु अशी धमकी अपहरणकर्त्यांनी दिली होती.