किल्लेधारूर दि. 19 अॉक्टोंबर - शहरातील बाराकमान म्हणून ओळख असलेल्या दरगाहमधील घुमट रात्री (दि.18) 8 ते 8.30 च्या दरम्यान कोसळल्याची घटना घडली. यात दरगाहमधील कबरी दबल्या गेल्या आहेत. सदरील घटनेमुळे सोशल माध्यमातून चर्चा होत आहे.
धारुर शहरातील डोंगरवेस पाटील गल्लीत बाराकमान दरगाह आहे. या दर्ग्याचे सुमारे चारशे ते पाचशे वर्षापूर्वी बांधकाम झालेले आहे. यात महेबूब सुभहानी चिल्ला व एका सुफी संतासह त्यांच्या कुटूंबातील सदस्यांच्या तीन कबरी आहेत. दरग्याच्या मधोमध सुफी संताच्या कबरीवर सुबक असा घुमट तर इमारतीच्या चौफेर बारा कमानी दगडी बांधकामात बांधलेल्या आहेत. यामुळेच याला बाराकमान दरगाह म्हणून ओळखले जाते.
धार्मिकसह ऐतिहासिक वास्तू असल्याने अनेक जण येथे भेट देत असतात. अवघ्या काही दिवसांवर या दरग्याचा संदल व उर्सचा धार्मिक कार्यक्रम आलेला असताना रात्री 8 ते 8.30 च्या दरम्यान अचानक दरग्यातील घुमट कोसळल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील रहिवासी व दरग्याच्या इनामदारांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत दरगाहमधील घुमट पडल्याने कबरीचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसात प्रचंड पाऊस कोसळत असून अतिशय जुन्या असलेल्या या इमारतीला तडे गेलेली असल्याने सदरील घटना घडल्याचा अंदाज आहे. सुदैवाने यात कसलीही जिवितहानी झालेली नाही. सदरील घटनेची प्रशासनाला माहिती देवून तात्काळ दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचे याचक फारुख दखनी यांनी सांगितले