Advertisement

अतिवृष्टीने पीक गेल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 18/10/2021
बातमी शेअर करा

                    

             

अंबाजोगाई-तीन मुलीच्या लग्नाची देणी फेडण्यासाठी यावर्षीच्या सोयाबीन पीकावर आशा ठेवुन बसलेल्या पुस येथील पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतुन विजयादशमी दिवशी किटक नाशक प्राषण केले होते. स्वारातीतुन लातुरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असताना शनिवारी मध्यरात्री प्राणज्योत मालवली. रविवारी मृत्तदेह घरासमोर आणताच कुटूंबियानी एकच टाहो फोडला.

                    तालुक्यातील पुस येथील भागवत निवृत्ती वाकडे वय ४५ यांना ६० आर कोरडवाहू जमीन असून या जमिनीच्या उत्पन्नातुन उपजिविका भागवत होते. रोजंदारी काम करुन व उसनवारी पैशातुन त्यांनी आपल्या तीन मुलीचे लग्न लावून दिले. मुलीच्या लग्नातील लोकांची देणे यावर्षीच्या उत्पन्नातुन देणार होते. त्यातच स्टेट बँक ऑफ इंडिया व जिल्हा बँकेचे असे मिळून पन्नास हजाराचे कर्ज देखील त्यांच्यावर होते. हे सर्व कर्ज यावर्षीच्या सोयाबिन उत्पनातुन देणार होते. परंतु सप्टेंबर महिण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे दीड एक्करातील सोयाबिन पीक पाण्यात नासुन गेले. विजयादशमी दिवशी शेतात गेल्यानंतर सोयाबिन पीक पाण्यात नासडी झाल्याचे पाहुण ते निराश झाले. आणि सायंकाळी सिमोलंघन करण्या ऐवजी घरातील खोलीचा आतुन दरवाजा बंद करुन किटक नाशक प्राषण केले. बाहेरुन पत्नी दार उघडण्यासाठी विनवणी करु लागल्या परंतु आतुन काहीच उत्तर न आल्यामुळे शेजार्यांनी दार तोडुन आत गेल्यानंतर भागवत वाकडे हा शेतकरी बेशुध्द आवस्थेत पडलेला दिसुन आला. ग्रामस्थांनी त्याला स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांना लातुरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले तेेेेथील उपचारानंतर शनिवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी दुपारी त्यांच्या मृत्तदेहावर पुस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

तिन्ही मुलीसह फोडला टाहो...

तीनही मुलीच्या लग्नाची देणे कशी फेडावी या विवंचनेतुन पित्याने आपली जीवनयात्रा संपवली. त्यांचा मृतदेह घरासमोर येताच तीनही मुलींनी टाहो फोडला. त्यामुळे ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.

 

जिल्हा परिषद अध्यक्ष पतीने केले सांत्वन...

अतिवृष्टीने पीक गेल्याच्या विंवचनेतुन शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांचे पती शिवाजीराव सिरसाट यांनी वाकडे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून शेतकरी आत्महत्याचे शासनाकडून अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

Advertisement

Advertisement