Advertisement

वादग्रस्त एपीआय गणेश मुंडेला लाच प्रकरणात अटक

प्रजापत्र | Wednesday, 13/10/2021
बातमी शेअर करा

उस्मानाबाद, दि. १३- पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका निनावी अर्जाप्रमाणे आरोपीवर कारवाई न करण्यासाठी पोलीस पाटलामार्फत एक लाख रूपयांची मागणी करून तडजोडीअंती ७० हजारांची लाच मागणार्‍या सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांच्यासह अन्य एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. गणेश मुंडे हा अधिकारी यापूर्वी देखील अनेक ठिकाणी वादग्रस्त राहिलेला आहे. 
येरमाळा पोलीस ठाण्यात ऑगस्ट महिन्यात निनावी तक्रारी अर्ज दाखल झाला होता. या अर्जातील आरोपींवर कारवाई न करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंढे याने रत्नापूर येथील पोलीस पाटील सुशन जाधवर याच्यामार्फत तक्रारदाराकडे २२ ऑगस्ट रोजी एक लाख रूपयांची लाच मागीतली होती. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नव्हती. तक्रारदारासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंढे यांनी जाधवर यांच्यामार्फत तडजोडीची बोलणी ठेवली. दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. तडजोडीअंती सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंढे व त्यांच्या साथीदाराने ७० हजार रूपयांची लाच स्वीकारून कारवाई न करण्याचे आश्‍वासन काही दिवसांपूर्वी दिले होते. यावेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील पंच उपस्थित होेते. ७० हजारांत झालेली तडजोड त्यांच्याच समोर झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंढे व पोलीस पाटील सुशन जाधवर यांच्यावर लाच मागीतल्याप्रकरणी कारवाई केली आहे. बुधवारी रात्री उशीरापर्यंत येरमाळा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपाधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक हुलगे, पोलीस अंमलदार अर्जुन मार्कड, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, विशाल डोके, अविनाश आचार्य यांनी केली.
गणेश मुंडे हा अधिकारी सातत्याने वादग्रस्त राहिलेला आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील अनेक प्रकरणात आरोप झाले आहेत. 

Advertisement

Advertisement