किल्लेधारूर दि.१२(वार्ताहर) येथील ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून सध्या हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कालच रिक्त पद भरण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या उपोषणानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साबळे यांनी येथे दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यास तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश काढले असून नसता कारवाईचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धारुर येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयात एकुण 29 पदे मंजूर आहेत. ज्यात 1 वैद्यकीय अधिक्षक, 3 वैद्यकीय अधिकारी, 7 परिचारिका, 7 चतुर्थ श्रेणी कर्मचारी, 2 लॕब टेक्नेशियन आदीचा समावेश आहे. यापैकी वैद्यकीय अधिक्षकासह एक वैद्यकीय अधिकारी रिक्त असून दोन रजेवर आहेत. परिचारिकापैकी दोन जागा रिक्त आहेत तर एकाची नुकतीच बदली झाली आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांत 4 कक्षसेवकांच्या जागा व एक लॕब असिस्टंट यांच्या जागा रिक्त आहेत. सध्या केवळ एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर संपूर्ण ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज सुरु आहे.
ग्रामीण रुग्णालय सध्या अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे असून अडचण नसुन खोळंबा अशा स्थितीत आहे. यामुळे काल दि.11 रोजी सामाजिक संघटनेच्या वतीने अतिक मोमीन यांनी याप्रश्नी आमरण उपोषण केले. विशेष म्हणजे उपोषण असताना याच दिवशी एका वैद्यकीय अधिकाऱ्याने रजा टाकली. मात्र आरोग्य विभागाने लेखी आश्वासन दिल्यामुळे उपोषणातून माघार घेण्यात आली. परंतू याची दखल घेवून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुर्यकांत साबळे यांनी रजेवर गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ कामावर येण्याचे आदेश काढले. यात दोन महिन्यापुर्वी रजेवर गेलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष रामचंद्र देशपांडे यांचा समावेश आहे.
राज्यात गतवर्षी 13 मार्च 2020 पासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 लागू करण्यात आला. या अधिसुचना प्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व कर्मचाऱ्यांना विशेषतः आरोग्य सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांना रजा मंजूर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे. असे असताना डॉ. देशपांडे दि.10 अॉगस्ट 2021 पासून गैरकायदेशीर पध्दतीने गैरहजर आहेत. यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे.