दि.12 अॉक्टोंबर – संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील आरोग्य केंद्रात कोरोनाच्या लसी उपलब्ध असूनही नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाने मोठा निर्णय घेतला आहे. पुन्हा कोरोनाचा संसर्ग होऊन उद्रेक होण्याची शक्यता असल्याने लस न घेणाऱ्या ग्रामस्थांना रेशन व विविध दाखले न देण्याचे तसेच व्यापाऱ्यांनी लसीकरण केल्याची पडताळणी करण्याचे धोरण ग्रामपंचायतीने घेतल्याची माहिती सरपंच म्हाळू गायकवाड यांनी दिली आहे.
आश्वीसह परिसरातील गावांमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वी खुर्दसह अनेक गावे लॉकडाऊन करून लसीकरणावर भर दिला आहे. आश्वी खुर्द गावची लोकसंख्या 5 हजारांच्या आसपास असून, 18 वर्षांवरील लसीकरणाला पात्र संख्या 4 हजारांच्या जवळ आहे.
गावात आतापर्यंत 3 हजार 200 ग्रामस्थांचे लसीकरण झाले आहे. आश्वी खुर्द येथे नियमित लसीकरण शिबिराचे आयोजन होऊनही बेजबाबदार नागरिक लसीकरणासाठी पुढे येत नसल्याने आलेले लसीचे डोस शिल्लक राहत आहेत. त्यामुळे आश्वी खुर्द ग्रामपंचायतीने याबाबत पुढाकार घेतला असून, गावातील नागरिकांची सुरक्षितता व हीत लक्षात घेता लसीकरणाला टाळाटाळ करणाऱ्या ग्रामस्थांचे रेशन व ग्रामपंचायत दाखले बंद करण्याचे धोरण घेतले आहे., गावातील सर्व व्यापारी, दुकानदार व भाजीपाला विक्रेते यांच्या लसीकरणाची पडताळणी ग्रामपंचायत पातळीवर होणार असल्याने उर्वरित ग्रामस्थांसह व्यावसायिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सरपंच म्हाळू गायकवाड, उपसरपंच सुनील मांढरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व आरोग्य विभागाने केले आहे.
याबाबत संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी कोरोनाची लस घेतली नाही तर ग्रामस्थांना रेशनवरील साहित्य देण्यात येणार नाही, यासंदर्भात तहसीलदार कार्यालयाकडून कुठल्याही सूचना दिल्या नसल्याची माहिती दिली. विविध प्रकारचे दाखले देण्याबाबत ग्रामपंचायत त्यांच्या पातळीवर निर्णय घेऊ शकते. मात्र, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने 100 टक्के लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया निकम यांनी दिली.