जिल्हा प्रमुखाच्या रॅलीत शहरप्रमुखाला मारहाण , उपजिल्हाप्रमुखावरील हल्ल्यात शिवसैनिकच आरोपी, महिला जिल्हाप्रमुखाच्या ग्रामपंचायतीत शिवसैनिकांचाच गोंधळ तर बीडच्या नगराध्यक्षांविरुद्ध उपजिल्हाप्रमुखांचे पत्रक
बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सारेच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करीत असतानाच शिवसेनेत मात्र स्वकियांनांच अडवाडविचे राजकारण फोफावत आहे. ज्या पक्षाला जिल्ह्यात निवडणुकीच्या राजकारणात फार करिष्मा दाखविता आला नाही, त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या एकमेकांबद्दल घुमसत असलेला असंतोष पक्षाच्या दृष्टीने मारक आहे. बीड जिल्ह्यात सेनेत सुरु असलेल्या या सुंदोपसुंदीला वरिष्ठ पातळीवर कोणाचे आशीर्वाद आहेत हाच प्रश्न निष्ठावान शिवसैनिकांना भेडसावत आहे.
बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसात शिवसेना अंतर्गत गटबाजी आणि पदाधिकाऱ्यांच्या आपसातील विरोधामुळेच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने जिल्हाप्रमुख आणि काही पदाधिकारी बदलले. त्यानंतर माजलगावात नूतन जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुख यांच्यातील वाद चर्चेत आले होते. यात अगदी चंद्रकांत खैरेंना मध्यस्थी करावी लागली होती. ही घटना ताजी असतानाच मंत्री संदीपान भुमरे यांच्यासमोर जिल्ह्यातील सेने पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्या उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप यांच्यावर हल्ला झाला आणि विशेष म्हणजे यातील आरोपी हे शिवसैनिकच निघाले . त्यामुळे सेनेतील अनेक आजीमाजी पदाधिकारी सध्या या हल्ल्याच्या मुख्य सूत्रधाराला शोधण्याची मागणी करीत आहेत. यासाठी त्यांनी मुंबईतही अनेकांच्या भेटी घेतल्या आहेत.
शनिवारी या नात्यात आणखी काही अंक जोडले गेले. महिला जिल्हापरमौख असलेल्या श्रीमती बांगर यांच्या कोल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत शनिवारी गोंधळ झाला आणि त्यातही गोंधळी सारे शिवसैनिकच होते अशी माहिती आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सरपंचांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून घोटाळे होत असल्याच्या तक्रारी स्वतः सरपंच श्रीमती बांगर यांनी केलेल्या आहेत हे विशेष . हे कमी की काय म्हणून , आता शिवसेनेत असलेल्या बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात थेट उपजिल्हाप्रमुख रतन गुजर यांनी पत्रक काढले आहे. हे पत्रक नागरी समस्यांसंदर्भात असले तरी यातील 'जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंच्या मार्गदर्शनात एकनाथ शिंदेंना भेटणार ' हे वाक्य राजकीय दृष्ट्या बोलके आहे. सेनेचे वाघ आपसातच गुरगुरत असल्याने सेना निवडणुकांना सामोरी जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिंदेंचा जिल्ह्यात सवतासुभा ?
बीड जिल्ह्यात शिवसेनेत सुरु असलेली सुंदोपसुंदी संपायचे नाव घेत नसतानाच येथे एक गट कोणत्याही विषयात थेट एकनाथ शिंदेंचे नाव घेतो. या गटाला मातोश्रीपेक्षाही एकनाथ शिंदेंचा आशीर्वाद जास्त महत्वाचा आणि बळ देणारा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच बीडमध्ये स्वतःचा सवतासुभा निर्माण करू इच्छित आहेत का हा प्रश्न निर्माण होत आहे .