Advertisement

ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात लवकरच 'शरद शतम' योजना-मुंडे             

प्रजापत्र | Friday, 01/10/2021
बातमी शेअर करा

 मुंबई-ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपाययोजनांच्या दृष्टीने 'शरद शतम' नावाची योजना प्रस्तावित केली असून राज्यात ही योजना सुरू करण्यापूर्वी तिची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्य स्तरावर एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. समितीचा अहवाल प्राप्त होताच ही योजना मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.  या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ६५ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करता येणार असल्याची  घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

 

             यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 'जागतिक ज्येष्ठ नागरिक' दिनानिमित्त आयोजित समृद्ध वृद्धापकाळ या चर्चा सत्राच्या उदघाटन प्रसंगी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे  बोलत होते. आ.बाळासोहब आजबे, सामाजिक न्याय विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, समाज कल्याण आयुक्त पुणे डॉ.प्रशांत नारनवरे, हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावंकर, मुंबईच्या माजी महापौर सौ.निर्मला सावंत प्रभावळकर, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, फेस्कॉमचे उपाध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी मुंडे म्हणाले की, आजाराचे वेळीच निदान व्हावे व त्यासाठी सर्व आरोग्य तपासण्या वर्षातून किमान एकदा तरी केल्या जाव्यात व त्या मोफत असाव्यात या उद्देशाने  'शरद शतम' ही योजना  खूप महत्वाची आहे. या योजनेची कार्यपद्धती,सर्वेक्षण या सर्व बाबींबरोबरच आजाराचे निदान झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन कमीत कमी खर्चात उपचार केले जावेत यासाठीचे समन्वयन या सर्व बाबी ठरवून अंतिम ऍक्शन प्लान तयार करण्यासाठी आम्ही आरोग्य सह विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय समिती नुकतीच गठीत केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही या योजनेचा प्रस्ताव मंत्री मंडळासमोर मंजुरीसाठी ठेवणार आहोत. ही सगळी कार्यवाही येत्या काही दिवसातच पूर्ण होणार असल्याचेही मंत्री श्री. मुंडे यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

Advertisement