Advertisement

धारुर तालुक्यातील आवरगावात गुढ आवाज

प्रजापत्र | Thursday, 30/09/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.३०- धारुर तालुक्यातील आवरगाव येथे भुगर्भातून गुढ आवाज येत असल्याने गावात भितीचे वातावरण आहे. भुकंपाच्या भितीने ग्रामस्थांनी रात्र रस्त्यावर जागून काढली आहे. रात्री 1.02 मिनिटांनी शेवटचा आवाज ग्रामस्थांशी ऐकला. याबाबत प्रशासनाला सुचना देण्यात आली असून आज गावात भुगर्भशास्त्रीय तज्ञ भेट देण्याची शक्यता आहे.

अंबाजोगाई ते आडस रोडवर आवरगाव हे गाव आहे. या गावात बुधवारी  रात्री गावाच्या चारही बाजूंनी गुढ आवाज येत आहेत. तोफ वाजविल्यानंतर आकाशात जसा आवाज येतो तसा आवाज आवरगाव  गावात येत आहे. या गुढ आवाजाने  ग्रामस्थ  भयभीत झाले असून मातीच्या घरातील भिंती पडण्याची व भुकंपाची भिती यामुळे लोक रस्त्यावर आले होते.

गावात गुढ आवाज येत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली आहे. मध्यरात्री पोलिस व महसूल प्रशासनाने आवरगावास भेट दिली.  आपत्ती व्यवस्थापनचे नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी लातूर व बीड यांचेशी संपर्क करत घटनेची माहिती दिली. यावर बीड येथील भूगर्भ शास्त्रज्ञ पथक आज पाहणी करण्याची शक्यता असून ग्रामस्थांनी घाबरण्याचे कारण नाही परंतू सावधानता बाळगून रहा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 

केंद्रेवाडी गावातही घडली होती घटना...
अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी येथे दि.6 सप्टेंबर रोजी भूगर्भातून गूढ  आवाज येऊ लागले होते. यामुळे बीड येथील भूगर्भ तज्ञांनी  दि.7 सप्टेंबरला केंद्रेवाडी गावास भेट देऊन परिसराची पाहणी केली. या पाहणीनंतर पाणीपातळी वाढल्याने हवेचा दाब निर्माण होऊन ती हवा कोरड्या बोअर मधून  बाहेर पडताना आवाज होत आहे असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता.

Advertisement

Advertisement