Advertisement

घराची भिंत ढासळल्याने महिलेचा मृत्यू, दोन जण गंभीर

प्रजापत्र | Wednesday, 29/09/2021
बातमी शेअर करा

गेवराई -घराची भिंत अंगावर पडल्याने यामध्ये एका ४५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले. हि दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील बोरगाव बु.येथे मंगळवारी रात्री घडली. जखमींवर औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हाहाःकार माजवला आहे. या नैसर्गिक संकटाने जनजीवन विस्कळीत केले आहे. शेती पिके मातीमोल झाली असून पशुधनाचे देखील मोठे हाल होत आहेत. तर अनेक ठिकाणी मातीच्या घरांच्या भिंती ढासळत असल्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी दुपारीच तालुक्यातील खांडवी येथे मोठा चिरबंदी वाडा ढासळल्याची घटना घडली होती. 
तर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बोरगाव (बु.) याठिकाणी घराची भिंत ढासळल्याची घटना घडली आहे. याठिकाणी घरात विकास उत्तमराव जाधव (वय ४८), छबुबाई विकास जाधव (वय ४४) व प्रमिला उत्तमराव जाधव (वय ४५) हे असताना अचानक घराची भिंत ढासळली यामध्ये प्रमिला जाधव यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर विकास जाधव व त्यांच्या पत्नी छबुबाई जाधव हे गंभीर जखमी झाल्याने या दोघांनाही औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 
मयत प्रमिला जाधव या विकास जाधव यांच्या धाकल्या बहिण होत्या. त्या आपल्या भावाकडेच वास्तव्यास होत्या. दरम्यान या दुर्देवी घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती पारनेरचे आमदार निलेश लंके यांना रात्री समजताच त्यांनी गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांना फोन करुन गंभीर दखल घेण्यास सांगितले असून मयत व जखमींना नैसर्गिक आपत्तीमधून तात्काळ मदत करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले जाते.

 

खांडवी येथे ४० खन चिरबंदी वाड्याची भिंत कोसळली ; सुदैवाने जीवितहानी नाही,
गेवराई तालुक्यातील खांडवी येथे सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे खांडवी येथील दत्तात्रय केशवराव टेकाळे व प्रशांत केशवराव टेकाळे यांच्या एका राहत्या चिरबंधी वाड्याची ४० खनाची भिंत कोसळली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराच्या वाड्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement

Advertisement