Advertisement

पुरात वाहवली चारचाकी, अनेक गावांचा तुटला संपर्क

प्रजापत्र | Tuesday, 28/09/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.28 सप्टेंबर - धारुर ते अंबाजोगाई रस्त्यावरील आवरगाव येथील वाण नदीला रात्री मोठा पुर आला असून अद्यापही पुलावरुन पाणी वाहत आहे. रात्री बीडहून लातूरकडे जाणारी चारचाकी गाडी या पाण्यात 200 मीटर वाहुन गेली असून सुदैवाने गाडीतील तिघांना वाचवण्यात आले आहे. सध्या आडस, अंबाजोगाईचा संपर्क तुटलेला असून सर्व वाहतूक बंद आहे.

गुलाब चक्रीवादळानंतर सुरु झालेल्या सततधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजला आहे. धारुर तालुक्यातही आठवडाभरापासून पाऊस सुरु असून कालपासून सततधार सुरु आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. अनेक पुलं वाहून गेली असून गावा गावात पाणी साचले आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे सोनीमोहा, व्हरकटवाडी, कोळपिंपरी, गांजपूर, चिंचपूर, ढगेवाडी, पहाडी दहीफळ, जागिर मोहा, मोरफळी, मोहखेड आदी गावांचा संपर्क तुटलेला आहे. रस्त्यावरील पुलावरुन पाणी वाहत आहे तर पाण्यामुळे अनेक रस्ते वाहून गेली आहेत. रात्री हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार रात्रभर जोरदार पाऊस झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.

आवरगावात कार वाहून गेली.
धारुर शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या राज्य रस्त्यावरील आवरगाव येथे वाण नदी दुधडी भरुन वाहत आहे. आवरगावच्या नळकांडी पुलावरुन जवळजवळ 6 फुट पाणी वाहत आहे. रात्री बीडहून लातूरकडे जाणाऱ्या कारचालकास पाण्याचा अंदाज आला नसल्याने कार क्र.एमएच 24 बीएल 1703 ही दोनशे मीटर वाहुन गेली. कारमधील तिघे तात्काळ गाडीतून बाहेर पडल्याने सुदैवाने अनर्थ टळला.

खोडस तलावाला धोका...
वाण नदीला आलेल्या पुरामुळे यावर बांधण्यात आलेल्या तलावांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. आवरगाव, हसनाबाद, कोळपिंपरी, पांगरी आदी भागात अतिवृष्टी झाल्याने खोडस तलावाला धोका निर्माण झाला आहे. तलावाच्या भिंती खचल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आमोल जगताप यांनी दिली. तात्काळ तलावाची दुरुस्ती करण्याची गरज असून प्रशासनाने धोका टाळण्यासाठी तत्परता दाखवावी अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement