Advertisement

आपेगावला पुराचा वेढा

प्रजापत्र | Tuesday, 28/09/2021
बातमी शेअर करा

दत्ता खोगरे
आपेगाव-मांजरा धरणाचे १८ दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या आपेगावला पुराने वेढा घातला आहे. अर्ध गाव पाण्याखाली गेले असून निसर्गाचा रुद्रावतारामुळे  शेती आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे.

 


       जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर झाला असून शेतीसोबत मोठी मनुष्यहानी ही झाली आहे. नदीकाठच्या गावांना यावर्षी मोठा फटका बसला आहे. मांजरा धरणाचे सर्व  दरवाजे मंगळवारी पहाटे उघडल्याने केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावात पुराचे पाणी शिरले आहे. आपेगावमधील महावितरण कार्यालय, दलित वस्ती, जिल्हा परिषद शाळा सोबत अनेक वस्त्या पाण्याखाली गेला असून मध्यरात्री अनेकांनी स्वतः चा जीव वाचविण्यासाठी पाण्यातून पोहत सुरक्षित स्थळ गाठलं आहे. सकाळपासून संपूर्ण गावाला पुराने वेढा घातल्याचे चित्र पाहायला मिळत असून अर्धे गाव पाण्याखाली गेले आहे.

नागरिकांनी सतर्कता बाळगावी
२३ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सोमवारपासून तर अधिकच धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यातील ओढे, नद्या क्षमतेबाहेर वाहत असून अनेक गावात पाणी शिरले आहे. बहुतांशी गावांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. शेती आणि मालमत्तेच्या नुकसानीची तर गिणतीच राहिली नाही. अखंडित पावसामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढल्याने मंगळवारी पहाटे धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही पुराचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मांजरा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्याची गेल्या अनेक दशकातील ही पहिलीच वेळ आहे.

Advertisement

Advertisement