पुणे-साखर आयुक्तांकडून राज्यातील ४४ साखर कारखान्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे, म्हणजेच ब्लॅक लिस्टेड करण्यात आलंय. या काळ्या यादीमधील कारखान्यांमध्ये बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे यांच्यासह माजी आमदार अमरसिंह पंडित यांचा देखील साखर कारखान्याचा समावेश आहे. हे ४४ कारखाने शेतकऱ्यांची कोणत्या ना कोणत्या मार्गाने फसवणूक करत असल्याचं साखर आयुक्तांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांचा ऊस घेऊन नंतर त्यांची फसवणूक करणाऱ्या साखर कारखान्यांचा खरा चेहरा शेतकऱ्यांसमोर यावा. कोणत्या कारखान्याची खरी परिस्थिती काय आहे याची माहिती शेतकऱ्यांना कळावी यासाठी राज्यात प्रथमच कारखान्यांचा लेखाजोखा जाहीर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार गळीत हंगामासाठी तयार असलेल्या १९० कारखान्यांची नियमित ऊसदर देणे, विलंबाने उसाची रक्कम देणे आणि वेळेत ऊसदर न दिल्याने झालेली कारवाई या निकषांआधारे चांगला-मध्यम-वाईट अशी वर्गवारी साखर आयुक्तालयाने जाहीर केली आहे.
हे कारखाने आहेत काळ्या यादीत
याचप्रमाणे भाजपा नेत्या पंकजा मुंडेंशीसंबंधित वैद्यनाथ कारखान्याचाही (परळी) या यादीमध्ये समावेश आहे. तसेच जय भवानी गेवराई कारखान्याचाही या यादीमध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे साताऱ्यातील किसनवीर खंडाळा, किसनवीर भुईंज, लोहारामधील उस्मानाबाद जिल्हा लोकमंगल माऊली शुगर कारखाना त्याचप्रमाणे मंगरुळमधील कांचेश्वर शुगरचाही या काळ्या यादीतील कारखान्यांमध्ये समावेश करण्यात आलाय.
सांगली एसजीझेड एसजीए शुगर तासगाव आणि खानापूर युनिट, पैठणमधील शरद कारखाना, लातूरमधील पन्नगेश्वर शुगर, औसामधील श्री. साईबाबा शुगर आणि नंदुरबारमधील सातपुडा तापीचाही या यादीमध्ये समावेश आहे.