Advertisement

किल्ल्यातील भिंती पडण्याची शृंखला सुरुच

प्रजापत्र | Monday, 27/09/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर-शहरातील ऐतिहासिक किल्ल्यात बांधण्यात आलेल्या नवीन दोन भिंती ढासळल्यानंतर इतिहास प्रेमी नागरिकांत मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला होता. काही दिवसानंतर संबंधित कंत्राटदाराकडून भिंत बांधण्यास सुरुवात केली.  मात्र पडलेल्या भिंतींचे काम पुर्ण होत नाही तोच आणखी एक बांधलेली भिंत कोसळल्याचे आज दिसून आले.
          धारुर शहरातील  ऐतिहासिक किल्ल्यात 2013 मध्ये राज्य पुरातत्व विभागाकडून  डागडूजी करण्यास सुरुवात झाली होती. सदरील काम गायत्री कन्स्ट्रक्शन औरंगाबाद या खाजगी कंत्राटदाराकडून करण्यात आले. या नवीन कामा पैकी खारी दिंडी व टकसाळ बुरुजाजवळची भिंती गतवर्षी कोसळल्या होत्या. सदरील काम निकृष्ट असल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या भेटी दरम्यान नागरिकांनी निदर्शनास आणून दिले होते. 
तत्पुर्वीही पुरातन खात्याकडे तक्रारी करण्यात आल्या मात्र त्याची कसलीच दखल घेतली नसल्याने अवघ्या चार ते पाच वर्षात नवीन भिंती ढासळू लागल्या असल्याचे दिसत आहे. नागरीकांच्या तक्रारी नंतर गतवर्षी अॉगस्ट महिन्यात संबंधित कंत्राटदाराकडून भिंतीचे काम सुरु करण्यात आले होते. अद्यापही गतवर्षी पडलेल्या भिंती पुर्ण झालेल्या नाहीत. तोच खारी दिंडी परिसरातील  नवीन भिंती पैकी आणखी एक भिंत कोसळली आहे.
एकीकडे शेकडो वर्षांपासुन अभेद्य असलेल्या पुरातन भिंती तग धरुन असताना नवीन भिंती पडत आहेत. याकामातही सिमेंटचा वापर होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. संबंधित कंत्राटदाराकडून जुन्या कामातही चुका करण्यात येत असताना पुन्हा भिंत कोसळण्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे. पुरातत्व विभागाने तात्काळ या कामाची चौकशी करुन   भिंती पुर्ववत कराव्यात अशी मागणी इतिहास प्रेमी नागरिकांतून होत आहे.

 

Advertisement

Advertisement