Advertisement

मांजरा धरणाचे दरवाजे दोन मीटरने उचलले

प्रजापत्र | Sunday, 26/09/2021
बातमी शेअर करा

केज : तालुक्यातील मांजरा धरणाच्या वरच्या भागासह वाघेबाभूळगाव, नांदूरघाट परिसरात शनिवारी रात्री तुफान पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी पाणीसाठा वाढू लागल्याने रविवारी (दि.२६) दुपारी १ वाजता धरणाचे सहा दरवाजे पुन्हा दोन मीटरने उचलण्यात आल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

 

गुरुवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मांजरा धरणात अतिवेगाने पाण्याची आवक सुरू झाली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी धरणाचे सहा दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले होते. अतिपावसामुळे आधीच शेतीचे नुकसान झाले असताना धरणातून पाणी सोडल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे दरवाजे केवळ ०.२५ मीटर उंचीपर्यंत उघडे ठेवण्यात आले होते. मात्र, शनिवारी रात्री मांजरा धरणाच्या वरच्या भागासह वाघेबाभूळगाव, नांदूरघाट परिसरात मुसळधार पाऊस झाला आणि धरणात ३५ हजार ८९३ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागल्याने रविवारी दुपारी १ वाजता धरणाचे सहा दरवाजे टप्प्याटप्प्याने दोन मीटर पर्यंत उचलण्यात आले आहेत. त्यातून नदीपात्रात सध्या ३५ हजार ९६८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आवश्यकता भासल्यास दरवाजे आणखी उघडण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नदीकाठच्या गावांचा पुराचा धोका अद्याप कमी झालेला नाही. 

अंजनपूर बंधाऱ्याचा पाचवा दरवाजा तुटला

दरम्यान, धरणातून पाणी सोडल्याने दोन दिवसापासून नदीला पूर आलेला आहे. पाण्याच्या दबावामुळे अंजनपुर-कानडी बोरगाव येथील बंधाऱ्याचे चार दरवाजे मागील दोन दिवसात तुटले होते. आज रविवारी दुपारी बंधाऱ्याचा पाचवा दरवजा देखील तुटला आहे. शनिवारीच आ. नमिता मुंदडा यांनी बंधाऱ्याची पाहणी करून दाराजांची दुरुस्ती, लाईटची व्यवस्था, रस्त्याची दुरुस्ती तसेच सदर बंधाऱ्यावर इलेक्ट्रॉनिक दरवाजांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

 

डाव्या कालव्याचे लाईनिंगचे काम पूर्ण करा - आ. मुंदडा

मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून या प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे लाईनिंगचे काम अर्धवट आहे. त्यामुळे सिंचनासाठी डाव्या कालव्याने पाणी सोडता यावे यासाठी सदर अर्धवट काम तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधिताना आदेश द्यावेत अशी विनंती आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना केली आहे.

Advertisement

Advertisement