Advertisement

बीड पोलीसांना धक्का: कोटयावधीच्या गुटखा प्रकरणातील 'तो' एफआयआर रद्द

प्रजापत्र | Friday, 11/09/2020
बातमी शेअर करा

बीडः बीड शहराच्या पेठ बीड पोलीस ठाण्यात तीन महिण्यापूर्वी ४० कोटीच्या गुटखा प्रकरणात दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने रद्द केला आहे. बीड जिल्हा पोलीसांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
पेठ बीड पोलीसांनी एप्रिल महिन्यात बीड शहरातील एका भंगारच्या गोदामावर छापा मारुन गुटख्याचे कुपन जप्त केले होते. हे कुपन गुटख्याच्या योजनेचे होते. त्या कुपनच्या आधारे पोलीसांनी तब्बल ४० कोटीच्या गुटख्याची खरेदी विक्री झाल्याचा ठपका ठेवत महेबुब खान या व्यापाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. कोरोनाच्या टाळेबंदी काळात एवढ्या मोठया प्रमाणावर गुटख्याचा व्यवहार झाल्याच्या गुन्हयाने सर्वत्र खळबळ माजली होती. मात्र या प्रकरणात पोलीसांना प्रत्यक्ष गुटखा सापडला नव्हता. पुढे यातील आरोपीला न्यायालयाने जामिन मंजूर केला होता.
पेठबीड पोलीसांनी दाखल केलेल्या या गुन्हयाच्या विरोधात आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली होती. त्यावर न्या. टी. व्ही. नलावडे यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान प्रत्यक्ष गुटखा न सापडल्याचा मुद्दा बचाव पक्षाने लाऊन धरला. त्यानंतर सदर एफआयआर रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. बचाव पक्षाच्या वतिने अँड आदित्य सिकची यांनी बाजू मांडली. हा निकाल पेठ बीड पोलीसांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Advertisement

Advertisement