Advertisement

मांजरा नदीच्या पुरात शेतकरी गेला वाहून

प्रजापत्र | Friday, 24/09/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने मांजरा नदीला आलेल्या पुरात सोयाबीन काढणीसाठी शेतात गेलेला तरुण शेतकरी वाहून गेला. ही घटना आज शुक्रवारी (दि.२४) अंबाजोगाई तालुक्यातील तडोळा येथे घडली.
                 राम बाबासाहेब कदम (वय ३१, रा. तडोळा) असे त्या  पुरात बेपत्ता झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी राम त्याच्या चुलत भावासोबत शेतात गेला होता. रामचे शेत मांजरा नदीकाठी आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा     विसर्ग केल्याने मांजरा नदीला सध्या पूर आलेला आहे. त्यामुळे नदीचे पाणी रामच्या शेतात घुसून सोयाबीन पाण्याखाली गेले आहे. डोळ्यादेखत पिकाचे नुकसान दिसत असल्याने राम शक्य होईल तेवढे काठावरचे सोयाबीन काढण्याच्या प्रयत्नात होता. सोयाबीन काढत असताना त्याला पाण्याच्या प्रवाहाने ओढून घेतले आणि भावाच्या डोळ्यासमोर राम वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार बिपीन पाटील हे तडोळा परिसरात दाखल झाले असून नदीच्या प्रवाहात बेपत्ता झालेल्या रामचा शोध सुरु आहे. रामच्या कुटुंबात त्याची आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार असून राम बेपत्ता झाल्याने सर्वजण हवालदिल झाले आहेत.

Advertisement

Advertisement