बाराभाईचा सामना करणार कसा ?
भाजपचे नेते एकनाथ खडसे मागच्या काही दिवसात पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मधल्या काळात एकनाथ खडसेंनी आपली तलवार म्यान केली होती. मात्र आता खडसेंचा तोफगोळा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर खर्ची होताना दिसत आहे. एकनाथ खडसेंवरच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्यावेळी एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा फडणवीसांवर टिकेची झोड उठवत आपण लवकरच ‘बाराभाईंची कारस्थाने’ या विषयावर एक पुस्तक लिहिणार आहोत असे म्हटले आहे. म्हणजे एका अर्थाने एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांची राजवट ‘पेशवाई’ची राजवट असल्याचेच अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील सामाजिक समिकरणांचा अभ्यास करता एकनाथ खडसेंसारख्या जुन्या जाणत्या नेत्याने देवेंद्र फडणवीस यांच्या टिमला ‘बाराभाई’ चे नाव द्यावे हे भाजपचे राजकारण कोणत्या संस्कृतीच्या पठडीतून जात आहे हे सांगायला पुरेसे आहे.
बाराभाई हे पेशवाईत राघोबा दादांना पेशवा होण्यापासून रोखण्यासाठी आणि नारायणरावाच्या मृत्युनंतर सवाई माधवरावांकडे पेशवाईची सुत्रे कशी राहतील हे पाहण्यासाठी झटणारे मंडळ होते. अर्थात नाना फडणवीस हे त्या मंडळाचे प्रमुख होते. बोकील, पेठे या सरदारांप्रमाणेच महादजी शिंदेंसारखे सरदारही त्या बाराभाईंमध्ये सामिल होते. इतिहासात या बाराभाईंच्या माध्यमातून ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्याला बाराभाईंची कारस्थाने असेच म्हणतात. आता देवेंद्र फडणवीसांच्या राजवटीत देखील अशीच कारस्थाने घडली असतील असे एकनाथ खडसेंना वाटू लागते त्यावेळी ही राजवट कोणत्या मार्गावर चालत होती हे बाहेरच्यांनी सांगण्याची गरज नाही.
एकनाथ खडसेंनी बाराभाईंच्या कारस्थानाचा उल्लेख इतका सहज केला असावा असेही नाही. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन वातावरण पुन्हा पेटू लागले आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. भाजप आणि शिवसंग्रामसारखे पक्ष यासाठी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला जबाबदार धरत आहेत. आम्ही मराठ्यांना आरक्षण दिले होते मात्र या सरकारला ते टिकविता आले नाही असे सागंत हे सरकार मराठाविरोधी कसे आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टिम करु लागली असताना एकनाथ खडसेंनी ‘बाराभाई’ ची टूम बाहेर काढली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय समिकरणांमध्ये पेशवाईला एका विशिष्ट वर्ग समुहात अडकविण्यात आलेले आहे. किंवा ही राजवट एका विशिष्ट वर्ग समुहाच्याच हिताची होती असा समज मागच्या काही दशकात रुढ झालेला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंसारख्या ज्या नेत्याने भाजपचा चेहरा बहुजन करण्यासाठी प्रयत्न केले तो नेता जर फडणवीसांच्या कारकिर्दीला बाराभाई संबोधित असेल तर फडणवीसांच्या राष्ट्रवादीला मराठाविरोधी ठरविण्याच्या अभियानाला खिळ घालण्याचाच हा प्रयत्न ठरतो. आता एकनाथ खडसेंसारखा नेता बाराभाईंचा‘सामना’ करत स्वत:ला कोणता ‘राष्ट्रवादी’ सिद्ध करणार हाच विषय आहे.
बातमी शेअर करा