पदाधिकारी नातलगाच्या हट्टाने जिल्हा परिषद कर्मचारी वैतागले
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेत जिल्हा परिषदेत सत्तांतर केले, मात्र त्या नंतर काही काळातच कोरोना सुरु झाला आणि सारेच 'व्यवहार ' थंडावले . याकाळात आपले 'अर्थचक्र ' चालू राहावे यासाठी बीड जिल्हा परिषदेतील एका पदाधिकाऱ्याचे नातलग स्वतःच पुढाकार घेऊन 'विकासाची ' जबाबदारी असलेल्या खात्यात अधिकारी कर्मचाऱ्यांकडे 'आहेराचा ' हट्ट करू करू लागल्याची चर्चा पदाधिकाऱ्यांच्या नातलगांच्या या 'राजहट्टा'ने कर्मचारी मात्र वैतागले आहेत.
बीड जिल्हा परिषदेत पालकमंत्री धनंजय मुंडेआणि राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी पुढाकार घेऊन सत्तांतर केले . यात माजी आ. अमरसिंह पंडित यांची भूमिका देखील महत्वाची होती. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शी होईल , कारभारावर नेत्यांचा अंकुश असेल असे वाटत होते. मात्र आजघडीला अनेक खात्यांमध्ये कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नसल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेत अनेकांच्या 'विकासाची ' जबाबदारी असलेली एक समिती आहे. या समितीचे सभापतिपद उपेक्षित समजलेलत्या समाजातून आलेल्या व्यक्तीकडे देण्यात आले. मात्र त्या समितीवर संबंधित सभापतीपेक्षा त्यांचे नातलगच जास्त अधिकार गाजवत 'बाबुराव ' होऊ पाहत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थेट बैठक घेऊ नका असे आदेश असतानाही अधिकारी कर्मचाऱ्यांना बोलावण्याचा प्रकार तर सुरूच आहे, पण या काळात दुसरी कोणतीच कामे नाहीत, म्हणून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्याला आणि सभापतीलाही 'आहेर ' करावा अशी अपेक्षा ते अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांकडून करीत असल्याची चर्चा आहे. हा 'आहेर ' देखील साधा नसावा तर तो 'गोदा पट्ट्याला' शोभणारा 'घनो मोटो ' असावा अशी अपेक्षा ते करीत आहेत . मोठ्या लोकांनी मागितले की काहीही देता आणि 'वाड्या तांड्या ' वरच्या लोकांनाच नाही का म्हणता असेही ते म्हणत असल्याची चर्चा आहे. यामुळे त्या खात्याचे अधिकारी ,कर्मचारी मात्र वैतागल्याचे चित्र आहे. आता जिल्हा परिषदेतील सत्तांतरासाठी झटलेल्या नेत्यांनीच या नातलगांना समज द्यावी , अजून धोंड्याचा महिना दूर आहे, आणि अशा वातावरणात माहेरची धोंड कर्मचाऱ्यांना परवडणारी नाही असे सांगावे अशी अपेक्षा कर्मचारी करीत आहेत.
बातमी शेअर करा