किल्लेधारूर दि.21 सप्टेंबर - आज मंगळवारी (दि.21) सांयकाळी 4 ते 5 च्या सुमारास तुळजापूरहून परतूरकडे साखर घेवून जाणारा टेम्पो धारुर घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने खाली उतरल्याची घटना घडली. या अपघातात कसलीही हानी झालेली नसली तरी चार दिवसातील घाटात झालेला हा चौथा अपघात आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र 548 सी वरील धारूर तेलगाव रस्त्यावर अवघड घाट आहे. मात्र अरूंद रस्ता असल्याने या घाटात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी सोलापूर कडून सिंमेट भरून परभणी कडे जाणारे ट्रक क्र. एम. एच. 12 एन.एक्स. 4090 हे सकाळी साडेनऊ चे दरम्यान अवघड वळणावर कठडा तोडून खोल दरीत जवळजवळ दोनशे मिटर खोल कोसळला. या अपघातात गाडीचा चालक पैंगबर पटेल हा जागीच ठार झाला होता.
काल दि.20 सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास साखर घेवून जाणारा ट्रकचा अपघात होवून झाडाला अडकला होता. यामुळे खोल दरीत कोसळन्यापासून बचावला होता. या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाले होते. या दोही अपघातस्थळी धारूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक नितीन पाटील तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहचले होते.
आज मंगळवारी (दि.21) धारुर घाटात पुन्हा साखर घेवून जाणारा टेम्पोचा (क्र. एम.एच. 23- 7207) अपघात घडला. सायंकाळी 4 ते 5 च्या दरम्यान तुळजापूरहून परतूरकडे मानवत येथील व्यापाऱ्यांची साखर घेवून जाणाऱ्या टेम्पो चालकाचे घाटातील वळणावर ताबा जावून टेम्पो उजव्या बाजूस गेला. टेम्पो चालक मोहमद नूर व इतर एक जण किरकोळ जखमी झाले आहेत. सतत होत असलेल्या अपघातामुळे धारुर घाट मृत्यूचा सापळा बनत आहे. घाट रुंदीकरण लवकरात लवकर करण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.