बीड दि.10 (प्रतिनिधी)-दोन दिवसांपूर्वी एलसीबीला संलग्न करण्यात आलेल्या कर्मचार्यांची ‘खासीयत’ जाहीरपणे विचारणार्या पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी अखेर एलसीबीवर सर्जिकल स्ट्रईक केला आहे. एलसीबीला संलग्न केलेले तब्बल 11 कर्मचारी त्यांच्या मुळ ठिकाणी पाठविण्याचे आदेश पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी रात्री उशीरा दिले आहेत. एलसीबी मधून एकाचवेळी इतके कर्मचारी परत पाठविण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे एलसीबीमध्ये मोठ्या प्रमाणावर फेर बदल अपेक्षित आहेत.
पोलीस अधीक्षकांनी दोन दिवसांपूर्वी सहाय्यक फौजदार आणि हेड कॉन्स्टेबलच्या बदल्या केल्या. या बदल्या करताना यातील एक दोघे एलसीबीमध्ये संलग्न असल्याची माहिती समोर आली. त्यावेळी दुसर्या ठाण्यातून एलसीबीत संलग्न करण्यासारखी कोणती ‘खासियत’ आपल्यात होती
आणि त्यानंतर आपण काय कामगिरी करून दाखविली अशी विचारणा खुद्द पोलीस अधीक्षकांनीच केल्याची माहिती आहे. सध्या एलसीबीत पोलीस नाईक आणि शिपाई संवर्गातील अनेक कर्मचारी इतर ठाण्यांमधून ‘संलग्न ’ म्हणून आलेले आहेत. त्यांची नावे बदलीपात्रच्या यादीत नाहीत, मात्र पोलीस अधीक्षकांनी संलग्नतेमागची ‘खासियत ’ शोधण्याची भूमिका घेतल्याने अशा अनेकांची संलग्नता धोक्यात आली. रात्री उशीरा स्थानिक गुन्हा शाखेचे 11 कर्मचारी त्यांच्या मुळ नियुक्तीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. मुळ ठिकाणी पाठविण्यात आलेल्या कर्मचार्यांमध्ये तुळशीराम जगताप, अभिमन्यू औताडे, श्रीमंत उबाळे, संतोष हंगे, झुंबर गर्जे, मुदतसर सिद्दीकी,अलिम जानु शेख, शेख अन्वर अब्दुल रौफ,नारायण कोरडे, गोविंद काळे, गणेश नवले यांचा समावेश आहे. यामुळे आता एलसिबीत मोठे फेरबदल अपेक्षित आहेत.
131 कर्मचार्यांच्या बदल्या
गुरुवारी बीड जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक आणि चालक संवर्गातील 131 कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात पोलीस नाईक संवर्गातील 100 तर वाहन चालक संवर्गातील 31 कर्मचार्यांचा समावेश आहे.दरम्यान आतापर्यंत सहाय्यक फौजदार, हेड कॉन्स्टेबल, पोलीस नाईक, वाहन चालक संवर्गातील बदल्या झाल्या असून आज पोलीस शिपाई संवर्गातील बदल्या होणार आहेत.