Advertisement

सावित्रीबाईंचा वारसा

प्रजापत्र | Saturday, 05/09/2020
बातमी शेअर करा

अशोक शिंदे
मुलींच्या शिक्षणासाठी सातत्याने झटणार्‍या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्प्त्याने महाराष्ट्राच्या मातीत स्त्री शिक्षणाचा विचार रूजविलेला आहे. हा विचार घेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात अनेकांनी स्त्रि शिक्षणाबाबत वेगवेगळे प्रयोग केले. मराठवाड्यात या विचारांचा प्रभाव जरा उशीरा पोहचला. सरंजामी राजवटीचा भाग असलेल्या मराठवाड्यात मुलींचे शिक्षण हे सहजासहजी समाजात पसरणारे नव्हते मात्र त्यासाठी ग्रामीण भागात ज्या काही संस्थांनी प्रयत्न केले त्यापैकी ग्रामीण कन्या माध्यमिक विद्यालय ही एक संस्था. नेकनूरसारख्या भागात या शाळेने मुलींच्या शिक्षणासाठी एक वेगळे दार उघडले आणि त्यातून कितीतरी पिढ्या घडल्या आहेत.
जगदीश शिंदे यांच्या प्रयत्नातून नेकनूरमध्ये ग्रामीण विद्यार्थी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून 86-87 ला ग्रामीण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुरू झाले. मुलींच्यासाठीची शाळा नेकनूरमध्ये सुरू करण्याचा मान या संस्थेचा. इतर ठिकाणी पहिली, दुसरीपासून वर्ग सुरू होतात या संस्थेने मात्र अगोदर आठवी ते दहावीचे वर्ग सुरू केले. त्यानंतर संस्थेला पाचवी ते सातवीचे वर्ग मिळाले. नंतरचा टप्पा कनिष्ठ महाविद्यालयाचा होता तर 2001 ला या संस्थेने प्राथमिक शाळा सुरू केली. ज्या संस्थेची दहावीची पहिली बॅच फक्त 15 मुलींची होती त्या संस्थेने मागच्या 32-33 वर्षात कितीतरी पिढ्या घडविल्या आहेत.


शाळा म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण देणारी इमारत नसली पाहीजे ही भावना जशी संस्थाचालक जगदीश शिंदे यांची होती त्याच भावनेने काम करणारे मुख्याध्यापक त्यांना मिळाले ते जे.एम.पैठणे यांच्या माध्यमातून. पैठणे सर परिवर्तनवादी विचाराच्या चळवळीतून आलेले, सानेगुरूजींचा प्रभाव असलेले याच प्रभावातून त्यांनी नेकनूरसारख्या ग्रामीण भागात काम सुरू केले. 1987 पासून ते आजतागायत ते या ठिकाणी कार्यरत आहेत. संस्थाचालक आणि शिक्षक एकाच विचाराचे असतील तर काय होते हे नेकनूरमध्ये या शाळेने दाखवून दिले. 
समाजाच्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करणारे, समाजात जे काही विषय सुरू असतात त्याचे आपल्या विद्यार्थ्याना आकलन व्हावे यासाठी धडपडणारे शिक्षक म्हणून पैठणे सरांकडे पाहीले जाते. म्हणूनच या शाळेच्या माध्यमातून स्काऊट गाईड, वृक्षारोपन, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, अल्प बचत, एड्स जनजागृती अशा वेगवेगळ्या विषयावर सातत्याने या शाळेत कार्यक्रम होतात. 1988 पासून सानेगुरूजी कथामालेचा उपक्रम राबविला जातो, यासोबतच विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांची सवय व्हावी यासाठी एमटीएस, एनटीएस, शिष्यवृत्ती, नवोदय, पिटीएस अशा परिक्षांची तयारी. विज्ञानमंचाच्या माध्यमातून वैज्ञानीक जाणीवा वाढविण्याचा प्रयत्न, ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती रूजविण्याचा प्रयत्न आणि आयसीटी संगणक प्रयोगशाळा या माध्यमातून आधुनिकतेशी नाते सांगण्याचा प्रयत्न शाळेच्या माध्यमातून होत आहे. जे.एम.पैठणे यांना 2014 चा राज्य शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे तर 2015 मध्ये सानेगुरूजी समाज शिक्षक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. संस्थाचालक आणि प्राचार्य एक दिलाने ज्योतिबा सावित्रीच्या विचाराचा वारसा चालवत आहेत.

 

Advertisement

Advertisement