बीड दि.२८ (प्रतिनिधी ) - शेअर मार्केटमध्ये तुला पैसे कमवून देतो, असे म्हणत एका भामट्याने युवकाकडून फोन पे वर पैसे मागवून घेतले. त्यानंतर तुझे शेअर्स विकले असून तुला मोठा फायदा होणार आहे, त्यासाठी टॅक्स भरावा लागेल, असे म्हणून युवकाकडून वेळोवेळी पैसे उकळले. एकूण १ लाख ३५ हजाराची फसवणूक केली. मात्र आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच युवकाने पेठबीड पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात तक्रार दिली आहे.
हेही वाचा... जिल्ह्याला काहीसा दिलासा! http://prajapatra.com/2988
कपाळे (वय २०, व्यवसाय शिक्षण, रा. एकता नगर नाळवंडी रोड पेठ बीड) या युवकाने पेठ बीड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पुणे येथील एका भामट्याने ‘तुला शेअर मार्केटमधून मोठा फायदा करून देतो,’ असे म्हणून युवकाला पैशाचे आमिष दाखविले व त्याच्याकडून फोन पे वरून पैसे मागवून घेतले. त्यानंतर तुझा शेअर मार्केटमध्ये फायदा झालेला आहे, तुला आता टॅक्स भरावा लागेल, असे म्हणून १ लाख ३५ हजार रुपये वेळोवेळी मागवून घेतले. मात्र पैसे परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर युवकाने पेठ बीड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निगरीक्षक विश्वास पाटील हे करत असून त्यांनी हा गुन्हा सायबर सेलकडे वर्ग केला आहे.