बीड : बीड जिल्हा पोलीस दलाला मागच्या काही दिवसांपासून बदल्यांचे वारे लागलेले आहे. पोलीस अधीक्षकांनी मोठ्याप्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असून अनेक ठाण्यांचा चेहराच यामुळे बदलला आहे. त्यासोबतच अनेक ठाणेदारांना आता बदल्यांचे वेध लागलेले आहेत. अनेकांनी इच्छीतस्थळासाठी 'बोलणी ' देखील केली आहे. मात्र पोलीस अधीक्षकांनी सध्या ठाणेदारांच्या बदल्यांचा विषयच थंड्या बस्त्यात ठेवला आहे. ठाणेदारांच्या बदल्यांची पोलीस अधीक्षकांना घाई नसल्याने इच्छुकांचे धाकधूक मात्र वाढली आहे.
बीड जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यांपासून ठाणेदारांच्या बदल्यांची चर्चा सुरु आहे.
नेमके कोणता अधिकारी कोठे जाणार याचादेखील चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहेत. कोणी कोणाशी बोलणी केली आहे तर कोणाला कोणीतरी शब्द दिला आहे . अनेकांनी बदलीसाठी आवश्यक 'प्रोटोकॉल ' पूर्ण करण्याची देखील तयारी केली आहे. पोलीस महासंचालक कार्यालय आणि त्यानंतर आयजी कार्यालयाच्या बदल्या झाल्यानंतर जिल्ह्यातील ठाण्यांमध्ये फेरबदल होतील असे सांगितले जात होते. आता आयजी कार्यालयाच्या बदल्या होऊन देखील चार दिवस उलटले आहेत, मात्र जिल्ह्यात ठाणेदारांच्या बदलीच्या दृष्टीने कसलीच हालचाल दिसत नसल्याने आता इच्छुक धास्तावले आहेत.
ठाणेदारांच्या बदल्यांसंदर्भात पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्याशी संपर्क साधला असता 'काही जणांची पदोन्नती आहे, आणखी काही जण येणार आहेत. नेमके कोण येणार , कोण जिल्ह्याबाहेर जाणार , हे अद्याप स्पष्ट नाही, त्यामुळे आताच बदल्या करता येणार नसल्याचे ' राजा यांनी म्हटले आहे. एसपींच्या या भूमिकेमुळे इच्छुकांची मात्र हिरमोड होत आहे.
हेही वाचा...
गेवराई नगरपालिकेवरील कारवाईसाठी अमरसिंह पंडित उच्च न्यायालयात
http://prajapatra.com/2968