बीड : दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात खळबळ माजवून दिलेल्या कोट्यवधींच्या हरभरा आणि तूर गहिवताल्यातील ६ आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली आहे. या सहा आरोपींना बीडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील १५ पेक्षा अधिक आरोपी अजूनही फरार आहेत.
तीन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात तयार आणि हरभरा खरेदीतील घोटाळा समोर आला होता. बीड जिल्हा कृषी औद्योगोक सर्व सेवा सहकारी संस्थेने मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यात तूर आणि हरभऱ्याची खरेदी केली होती.
शेतकऱ्यांकडून या मालाची खरेदी करण्यात आल्यानंतर मार्केटिंग फेडरेशनकडून त्याची रक्कम उचलण्यात आली मात्र फेडरेशनला सदर माल दिलाच गेला नाही. याप्रकरणात काही व्यक्तींनी तक्रारी केल्या, उपोषणे झाली , त्यानंतर एप्रिल २०१९ मध्ये या प्रकरणात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात बीड जिल्हा कृषी औद्योगोक सर्व सेवा सहकारी संस्थेचे संचालक, केंद्र प्रमुख, ऑपरेटर यांना आरोपी करण्यात आले होते. याप्रकरणात आतापर्यंत केवळ चाँदसाहेब हसनभाई बागवान या एकाच आरोपीला अटक करण्यात आली होती, तर इतर आरोपी फरार होते.
सदर प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पी. आर. भिंगारे यांच्यासह सुरेश सांगळे, राजू पठाण , श्री. बहिर्वळ, श्री भिसे यांनी वेगवेळ्या ठिकाणाहून यातील ६ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यांना केली अटक
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गणेश चोरमले (वय ३८, केंद्र प्रमुख वडवणी ), मुंजाबा मैंद (वय ३९ , ऑपरेटर चिंचाळा ), जावेदमिया बागवान ( वय ४०, केंद्रप्रमुख बीड व गेवराई ) , गोविंद दौंड (वय ४२ , ऑपरेटर परळी ), राजाराम काजगुंडे (वय ३९, ऑपरेटर परळी ), श्रीराम शिंदे (वय ३७, ऑपरेटर गेवराई ) यांचा समावेश आहे.
हेही वाचा...
दहीहंडीवर निर्बंध कायम
http://prajapatra.com/2943