Advertisement

जिल्हा बँकेच्या मदतीला धावले जिल्हाधिकारी

प्रजापत्र | Sunday, 22/08/2021
बातमी शेअर करा

 

 बीड : प्रशासक मंडळाच्या ताब्यात असलेल्या येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी ) बँकेच्या मदतीला आता स्वतः जिल्हाधिकारी धावले आहेत. जिल्हा बँकेने खरीप पीक कर्ज वाटपात उद्दिष्ट पूर्ती केल्यानंतर आता बँकेला अधिकचे कर्ज वाटप करता यावे आणि रब्बी हंगामात कर्ज वाटपात करता यावे बँकेला अडीचशे कोटीचे कर्ज देण्याची शिफारस बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शिखर बँक आणि नाबार्डला केली आहे.

 

बीडच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक परिस्थिती अजूनही पुरेशी सुधारलेली नाही. एकेकाळी जिल्ह्यात सर्वाधिक पीक कर्ज जिल्हा बँकेमार्फत वाटप केले जायचे, मात्र मागच्या १० वर्षात जिल्हा बँकेची परिस्थिती फारशी चांगली नसल्याने बँकेचे उद्दिष्ट कमी करण्यात आले होते. यावर्षी जिल्हा बँकेने २०० कोटीहून अधिकचे पीक कर्ज वाटप केले आहे. मात्र आतापर्यंत जिल्हा बँकेच्या मदतीला फार कोणी येत नव्हते . अगदी राज्यात भाजपची सत्ता आणि जिल्हा बँक देखील भाजपच्याच ताब्यात असताना देखील जिल्हा बँकेला फारशी मदत झाली नव्हती.

या पार्श्वभूमीवर आता प्रशासक मंडळाच्या ताब्यात असलेल्या जिल्हा बँकेच्या मदतीसाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुढारी घेतला आहे. जिल्हा बँकेने खरिपाचे कर्ज वाटप चांगले केले असल्याने बँकेला अधिकच्या कर्ज वाटपासाठी २०० कोटी आणि रबीच्या कर्जवाटपासाठी ५० कोटीचे कर्ज मंजूर करावे अशी शिफारस जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शिखर बँकेला केली आहे. जिल्हा बँकेच्या संदर्भाने एकप्रकारचा विश्वास निर्माण व्हावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे.

 

 

Advertisement

Advertisement