बीड : देशपातळीवर बालविवाहाच्या विरोधात मोठ्याप्रमाणावर जागृती करण्यात येत असली तरी महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण अजूनही सर्वाधिक आहे. बालविवाहांमध्ये बीड जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर असून बीडमधील बालविवाहाचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या दुप्पट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच बीडसह राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये बालविवाह रोखण्यासाठी 'सक्षम ' नावाचा प्रकल्प राबविला जाणार आहे.
२०३० सालापर्यंत बाल विवाह निर्मूलन करण्याच्या अनुषंगाने, महाराष्ट्र सरकारच्या महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन (एसबीसी 3) यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलनासाठी संवादातून मानसिकता बदल रणनितीची अंमलबजावणी केली जात आहे.या उपक्रमाला 'सक्षम' असे संबोधण्यात आले आहे. बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक असणाऱ्या १२ जिल्ह्यात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यातील ३ जिल्हे मराठवाडयातील आहेत.
बीड जिल्ह्यात स्थलांतरित कामगारांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच या जिल्ह्यात अजूनही बालविवाहाचे प्रमाण मोठे आहे. सामाजिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा आणि अस्थिर वातावरण अशी अनेक करणे या बालविवाहामागे आहेत . आतापर्यंत बालविवाह रोखण्यासाठी कायद्याचा धाक वापरला जात होता, मात्र आता कायद्यासोबतच सामाजिक मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठीच या जिल्ह्यांमध्ये 'सक्षम ' प्रकल्प राबविला जाणार आहे. बाल विवाह निर्मूलनासाठी जिल्हा कृती आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा कार्य दलाची स्थापन करण्याची आणि त्यांच्या सहकार्याने बाल विवाह रोखण्यासाठी कृती आराखडा विकसित करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाला करण्यात आलेली आहे. तसेच लोकप्रतिनिधी, वेगवेगळ्या विभागातील अधिकारी, आणि युवा गट यांच्या सोबत बालविवाह निर्मूलन या विषयावर ऑनलाईन अभिमुखता कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली असल्याचे महिला बालकल्याण आयुक्त राहुल मोरे यांनी म्हटले आहे.
सर्वाधिक बालविवाह होणारे जिल्हे
राज्याची सरासरी २१. ९
परभणी ४८
बीड ४३. ७
धुळे ४०. ५
सोलापूर ४०. ३
लातूर ३१
नाशिक २९. ६
जळगाव २८