Advertisement

 'संघर्षाच्या' काळात मस्केंनी दिले भाजप संघटनेला बळ

प्रजापत्र | Friday, 20/08/2021
बातमी शेअर करा

 

 

बीड : विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यात भाजपची घटलेली शक्ती, राज्यात आणि जिल्ह्यात झालेला सत्ताबदल आणि स्वतः पंकजा मुंडेंच्याच शब्दात सांगायचे तर त्यांच्या 'अडचणीच्या' , 'संघर्षाच्या ' काळात बीड जिल्ह्यात भाजप पक्ष संघटनेला बळ देण्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी यश मिळविले आहे. मागच्या १८ महिन्यात राजेंद्र मस्के यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी केवळ पेललीच नाही तर कोरोनाचे निर्बंध असतानाही संघटनेला एक वेगळे वलय प्राप्त करून दिले आहे.

 

सत्तेतील पक्षाचे काम करण्यासाठी अनेकजण तयार असतात. सत्तेची फळे उपलब्ध असल्याने सत्तेतल्या पक्षाकडे कार्यकर्त्यांचा ओढा असणे साहजिक आहे. मात्र सत्तेत नसलेल्या पक्षाचे काम करणे हे आजच्या काळात तसे आव्हानाचे काम असते. त्यातही सत्तेच्या काळात ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी 'सुवर्णकाळ ' अनुभवला त्या पक्षाला विरोधात बसण्याची वेळ आल्यानंतर संघटना टिकविणे आणि वाढविणे , कार्यकर्त्यांमधील समन्वय राखणे अवघड असते. आणि हेच अवघड आव्हान पेलण्याचे काम राजेंद्र मस्के  पार पाडत आहेत .
१८ महिन्यांपूर्वी राजेंद्र मस्के यांनी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली, त्यावेळी जिल्ह्यातील अनेक सत्तास्थानांमधून भाजप बाजूला झाला होता. राज्यात सत्ताबदल झाला होता. अशा काळात जिल्ह्यातील विरोधी पक्षाची जबाबदारी मस्के यांनी सहजपणे पेलली . जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर  केलेली आंदोलने असतील किंवा कोरोनाच्या काळात सामान्यांच्या मदतीसाठी उभारलेली यंत्रणा असेल, भाजपच्या माध्यमातून राजेंद्र मस्के यांनी संघटना सक्रिय ठेवण्याचे काम केले.

 

 

 

राज्यात भाजपमध्ये उलथापालथी होत असताना , बीड जिल्ह्यात भाजपला एकसंघ ठेवण्याचा विषय असेल किंवा सर्वांना सोबत ठेवण्यासाठी समन्वयकाची निभावलेली भूमिका असेल, मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयात भाजपची भूमिका सामन्यांमध्ये पोहचविण्याचा त्यांचा प्रयत्न, कृषी कायद्यांसंदर्भातील पक्षाची भूमिका मांडणे आणि एकूणच ज्या काळात कोरोनामुळे प्रत्यक्ष संपर्क ठेवणे देखील अवघड होते त्या काळात कार्यकर्त्यांमधील समन्वय टिकविण्याचे अवघड काम मस्के यांनी लीलया पार पाडले .
मागच्या काही महिन्यातील काळाचा उल्लेख स्वतः पंकजा मुंडे यांनी देखील 'संघर्षाचा ' काळ असा केला. स्वतः पंकजा मुंडेंना पक्षात करावा लागत असलेला संघर्ष आणि त्यामुळे साहजिकच मुंडे समर्थकांसमोर असलेल्या अडचणी, त्यात पक्षाची शिस्त , मात्र साऱ्या गोष्टीचा समतोल साधत पक्षाला बळकटी देण्याची कसरत 'संघर्ष योद्धा 'कार्यालयातून राजेंद्र मस्के करीत आहेत. 

 

 

 

Advertisement

Advertisement